|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 100 टक्के मुद्दल फेडण्याची विजय मल्ल्याची तयारी

100 टक्के मुद्दल फेडण्याची विजय मल्ल्याची तयारी 

सोशल माध्यमावरून ट्विट : व्याजाची रक्कम देण्यास नकार

लंडन :

बँकांची फसवणूक आणि मनी लाऊड्रिंग प्रकरणी ब्रिटन न्यायालयात सुनावणी होत असलेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या याने कर्जाचे मुद्दल 100 टक्के फेडण्याची तयारी दर्शविली आहे. आरोपी मल्ल्याने बुधवारी हा  प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव बँक आणि सरकारने मान्य करावा, अशी विनंती सोशल मीडियाच्या माध्यमावरून विजय मल्ल्याने ट्विट केली आहे. तथापि, व्याज फेडण्यास त्याने नकार दिल्याने त्याची ही केवळ मखलाशी आहे, असे दिसत आहे.

 किंगफिशर एअरलाईन्सचा 62 वर्षीय सर्वेसर्वा विजय मल्ल्या गेल्यावर्षीपासून देशाबाहेर आहे. बँकांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये मल्ल्यावर 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मल्ल्या 2 मार्च 2016 रोजी भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देश सोडून परदेशात पसार झाला. मल्ल्याला कर्ज देणाऱया भारतीय स्टेट बँकेने कायदेशीर सल्ला घेऊन 28 फेब्रुवारी न्यायालयात मल्ल्याला देश सोडून बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. पण याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने त्यानंतर चार दिवसात मल्ल्या देश सोडून परदेशात पसार झाला.

किंगफिशर मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून गेल्या तीन दशकात कंपनी भारतभर मोठा व्यवसाय केला असून आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपये दिले आहे, असे विजय मल्ल्याने माध्यमावरून ट्विट केले आहे. किंगफिशर एअरलाइन्सने अनेक राज्यांना मदत केली पण दुर्दैवाने एअरलाइन्सचे नुकसान झाले. तरीही मी बँकांना कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करायला तयार आहे. यामुळे बँकांचे नुकसान होणार नाही, असेही त्याने सांगितले आहे. एअरलाइन्स कंपनीला इंधन महागल्यामुळे फटका बसला आणि त्यातच कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. ते नुकसान भरून काढण्यासाठी बँकांकडून कर्ज काढण्याशिवाय कंपनीला पर्याय नव्हता. किंगफिशर ही एक शानदार एअरलाइन कंपनी होती, पण त्यावेळी कच्च्या तेलाचे दर 140 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले होते. यामुळे कंपनीचा तोटा झाला आणि त्याचबरोबर बँकांचे कर्जही वाढले.

प्रसारमाध्यमे आणि नेतेमंडळी यांनी माझ्यावर बँकांचे कर्ज बुडवून पसार झाल्याचा आरोप केले आहे पण त्यात काहीच तथ्य नाही. त्याचबरोबर आगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळय़ातील आरोपीचे प्रत्यार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्याने बँकांच्या थकीत कर्जावर भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यवाही होत असताना मल्ल्याकडून बँकांना दोन समझोता प्रस्ताव दिले होते पण दोन्ही प्रस्ताव बँकांनी नाकारले होते. पण यावेळी मी बँकांचे 100 टक्के मुद्दल फेडायला तयार आहे. त्यासाठी कृपया बँकांनी माझा हा प्रस्ताव स्विकारावा, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.