|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजस्थान, तेलंगणात भरघोस मतदान

राजस्थान, तेलंगणात भरघोस मतदान 

काही ठिकाणी मतदानयंत्रांमध्ये बिघाड

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राजस्थान आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात मतदान झाले आहे. राजस्थानात मतदानाची टक्केवारी 73.85 असून तेलंगणात ती 70 असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. अशा प्रकारे पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आता साऱया देशाला निकालाची प्रतीक्षा आहे. निकाल 11 डिसेंबरला लागणार आहेत.

राजस्थानात 2013 च्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदान 1.40 टक्क्यांनी कमी झाले आहे. मतदानप्रक्रियेनंतर आता मुख्यमंत्री वसुंधरा राजे, त्यांचे प्रतिस्पर्धी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट तसेच तेलगंणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे भवितव्य आता यंत्रात बंद झाले आहे.

राजस्थानात 160 मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनमध्ये बिघाड झाल्याने मतदानात व्यत्यय आला. काही ठिकाणी मतदान उशीरा सुरू झाल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. बिकानेर जिल्हय़ाच्या कोलायत या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये हिंसक दंगल झाली. तथापि, परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यात आली.