|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सावळीत सासऱयाकडून जावयाचा निर्घृण खून

सावळीत सासऱयाकडून जावयाचा निर्घृण खून 

 

प्रतिनिधी/ कुपवाड

मिरज तालुक्यातील सावळी येथे शुक्रवारी मध्यरात्री जावयाने मुलीवर लोखंडी पाईपने खुनीहल्ला केल्याने रागातून चिडून सासऱयाने जावयाला बेदम मारहाण करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन जावयाने मुलीच्या डोक्यात लोखंडी पाईपने जोरदार प्रहार करुन गंभीर जखमी पेल्याने या घटनेमुळे संतप्त झालेल्या मुलीच्या वडिलांसह कुटुंबीयांनी जावयास लाकडी खांबास बांधून लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात जावयाचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी मुलीवर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घटना घडली असून याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.

यामध्ये ज्ञानेश्वर गोपाळ बामणे (40, रा.बसर्गी, ता.जत) असे खून झालेल्या जावयाचे नाव असून पतीच्या हल्ल्यात सौ. गीतांजली उर्फ गायत्री ज्ञानेश्वर बामणे (30) ही गंभीर जखमी आहे. याप्रकरणी मुलीचे वडील आणि सावळीचे माजी उपसरपंच अण्णासाहेब गंगाराम शिंदे (60) यांना अटक केले आहे. तर मुलीचा भाऊ राहुल अण्णासाहेब शिंदे (28, दोघे रा. सावळी) याला संशयावरुन ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. जावयाच्या विरोधात संशयित अण्णासाहेब यांचा मुलगा राहुल शिंदे यांनी तर ज्ञानेश्वर बामणे याचा खून केल्याच्या संशयावरुन अण्णासाहेब शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात ज्ञानेश्वरचा चुलतभाऊ पांडुरंग पुंडलिक बामणे यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सावळीचे माजी उपसरपंच अण्णासाहेब शिंदे यांची मुलगी गीतांजली हिचा बसर्गीचे ज्ञानेश्वर बामणे यांच्याशी 15 वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना आदित्य (11) व पार्थ (8) ही दोन मुले झाली. सावळीच्या उरुसानिमित्त गीतांजली पती व मुलांसोबत चार दिवसांपूर्वी सावळीतील माहेरी आली होती. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर व गीतांजली यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर उरुसानिमित्त आयोजित कलापथक पाहण्यासाठी गेला. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा तो घरी आला. रात्री सर्वजण झोपी गेले होते. रात्री तीनच्या सुमारास तो झोपेतून जागा झाला. पत्नीसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरुन त्याने घरातील लोखंडी पाईप हातात घेऊन पत्नी झोपेत असताना अचानकपणे तिच्या डोक्यात जोराने प्रहार केला. यात तिच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली. यावेळी जागे झालेली गीतांजलीची आई सौ. सुलोचना यांना जावई मुलीला पाईपने मारत असल्याचे दिसले. यावेळी जावयाला रोखण्याचा प्रयत्न करताना जावयाने सासुलाही पाईपने मारहाण केली. यात सासूच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दोघींच्या ओरडण्याने अण्णासाहेब शिंदे यांसह घरातील सर्वजण झोपेतून जागे झाले. हल्ला करुन जावयाने घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अण्णासाहेब व त्यांच्या कुटुंबीयांनी जावयाला पकडून त्याला अंगणातील लाकडी खांबाला दोरीने बांधून ठेवले. मुलीला व तिच्या आईला झालेली मारहाण पाहून सर्वजण चांगलेच संतापले होते. अण्णासाहेब व त्यांच्या नातेवाईकांनी रागाच्या भरात मुलीला मारलेली लोखंडी पाईप, लाकडी दांडके हातात घेऊन जावयाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात जावयाच्या डोक्यात, हातावर व पायावर गंभीर दुखापती झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. यात जावई ज्ञानेश्वर जागीच बेशुद्ध पडला. अण्णासाहेब यांचे घर गावातील मध्यवर्ती भागात व सावळी ग्रामपंचायतीच्या शेजारी असल्याने मध्यरात्रीचा आरडाओरडा सुरु झाल्याने बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच कुपवाडचे सपोनी संग्राम शेवाळे यांसह कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी हटवली आणि जखमी ज्ञानेश्वर, त्याची पत्नी सौ. गीतांजली व मुलीची आई सुलोचना या तिघांना उपचारासाठी तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. ज्ञानेश्वरचा उपचारापूर्वीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सौ. सुलोचना यांच्या हातावर उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आले. तर गंभीर जखमी सौ. गीतांजली हिच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, मिरजेचे उपाधीक्षक अनिल पोवार, सपोनी संग्राम शेवाळे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. ज्ञानेश्वरच्या मृत्यूची बातमी कळताच त्याची आई, बहीण व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी करुन आक्रोश केला.

दरम्यान, मयत ज्ञानेश्वर बामणे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर यापूर्वी जत पोलिसांत खून व खुनाचा प्रयत्न याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षापूर्वी त्याने कौटुंबिक वादातून पत्नीवरही हल्ला केला होता. त्यावेळी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यात दोघांच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला होता. तरीही पती-पत्नीतील वाद वारंवार धुमसतच होता. शुक्रवारी या वादाला पूर्णविराम मिळाल्याची भावना घटनास्थळी शिंदेच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

Related posts: