|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » तबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध ‘सवाई’ महोत्सवातील ‘अंतरंग’मध्ये पं. तळवलकर यांचा संवाद

तबल्यामुळे भारतीय संगीत समृद्ध ‘सवाई’ महोत्सवातील ‘अंतरंग’मध्ये पं. तळवलकर यांचा संवाद 

पुणे / प्रतिनिधी :

तबल्याने भारतीय संगीताला समृद्ध केले आहे, मात्र तबलावादकाने गिमिकच्या मागे न लागता, मूळ संगीताशी प्रामाणिक राहायला हवे, असे मत तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या दुसऱया दिवशी संगीत समीक्षक केशव परांजपे यांनी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुलाखत घेतली. त्यावेळी तळवलकर बोलत होते.

पं. तळवलकर म्हणाले, तबल्याची उत्पत्ती भारतातच साडेतीनशे वर्षांपूर्वी झाली. शाई लावलेले वाद्य भारतातच आहे. पखावजाचे बोल तबल्याने घेतले. तबल्याने अनेक फॉर्म निर्माण केले. तबल्याला अनेक भाषेने आणि भावांनी समृद्ध केले आहे. तबला ख्याल, धृपद धमार, नृत्य अशा सगळय़ाची साथ करू शकते आणि तो सोलोही वाजतो. त्यामुळे तबल्याने संगीताला समृद्ध केले आहे.

तबलावादक ज्या फॉर्मसाठी वाजवतो, त्याच्याशी तो प्रामाणिक राहायला हवा. ज्यावेळी साथ करीत आहोत, त्यावेळी तसेच वाजवले पाहिजे. सोलोसारखे वाजवून चालणार नाही. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी काही गिमिक करू नये. जे सांगता येत नाही, ती अनुभूती आणि अनेक अनुभूती आल्या, की त्याचे ज्ञान होते. त्यासाठी साधना करायला लागते. आता तंत्र वाढत चालल्याने गिमिक वाढत आहे. त्यामुळे सगळे अविष्कार लुप्त व्हायला लागले आहेत. मेगा इव्हेन्टमध्ये असे गिमिक होतात, ते टाळण्यासाठी बैठकीचा माहोल हवा आणि कलाकाराने मूळ संगीताला सोडू नये. टाळय़ांसाठी काही करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.