|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » हॉलंड सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत

हॉलंड सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत 

विश्वचषक हॉकी स्पर्धा : ऑस्ट्रेलियाचे हॅट्ट्रिकचे स्वप्न उद्ध्वस्त,

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

जागतिक हॉकी क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱया हॉलंडने ऑस्ट्रेलियाचे जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करताना येथे झालेल्या उपांत्य सामन्यात सडनडेथवर 4-3 असा पराभव करीत विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. रविवारी बेल्जियमशी त्यांची जेतेपदाची लढत होणार आहे.

2014 मध्ये हेग येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत हॉलंडला ऑस्ट्रेलियाकडून 1-6 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाची परतफेड त्यांनी येथील सामन्यात केली. अतिशय रोमांचक ठरलेल्या या लढतीत नियमित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. नियमित वेळेत ग्लेन श्कुरमन (9 वे मिनिट) व सीव्ह व्हान ऍस (20) यांनी हॉलंडचे तर टिम हॉवर्डने (45) पेनल्टी कॉर्नरवर आणि एडी ओकेन्डनने 60 व्या मिनिटाला 26 सेकंद बाकी असताना ऑस्टेलियाला बरोबरी साधून दिली. शूटऑफमध्ये डॅनियल बीयल, टॉम पेग, जेक व्हेटॉन यांनी ऑस्ट्रेलियाचे तर जेरॉन हर्ट्झबर्गर, व्हान ऍस व थिस व्हान डॅम यांनी हॉलंडचे गोल नोंदवल्याने पुन्हा बरोबरी झाली आणि सामना सडनडेथवर गेला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बीयलचा फटका हॉलंडचा गोलरक्षक पिरमिन ब्लाकने यशस्वीरीत्या थोपविला तर हर्ट्झबर्गरने अचूक गोल नोंदवून हॉलंडला सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठून दिली.

नियमित वेळेतील खेळात हॉलंडने प्रारंभी स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला. यावेळी ऑस्ट्रेलियाने आक्रमक धोरण अवलंबत अनेकदा हॉलंडच्या क्षेत्रात घुसखोरी केली. पण त्यांना गोल नोंदवण्यात यश आले नाही. स्थिरावल्यानंतर हॉलंडने 9 व्या मिनिटाला पहिले यश मिळविले आणि 20 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून विजयाच्या दिशेने आगेकूच केली. तिसऱया सत्राच्या अखेरच्या मिनिटाला ऑस्टेलियाने गोल नोंदवून त्यांची आघाडी कमी केली आणि सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून बरोबरी साधली. मात्र अखेर त्यांना सडनडेथमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

रविवारी होणाऱया अंतिम फेरीत हॉलंडची लढत पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱया बेल्जियमशी होणार आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात इंग्लंडचा 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात अंतिम लढतीआधी तिसऱया व चौथ्या स्थानासाठी लढत होईल.

 

शनिवारचे निकाल

बेल्जियम विजयी वि. इंग्लंड 6-0

हॉलंड विजयी वि. ऑस्ट्रेलिया 4-3

 

रविवारचे सामने

ऑस्टेलिया वि. इंग्लंड (कांस्यसाठी), सायं. 4.30 वा.

बेल्जियम वि. हॉलंड (सुवर्णपदकासाठी), सायं. 7 वा.

Related posts: