|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पुतीन यांची छायाचित्रे असलेल्या दिनदर्शिकेला जपानमध्ये मागणी

पुतीन यांची छायाचित्रे असलेल्या दिनदर्शिकेला जपानमध्ये मागणी 

टोकियो

 रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे जपानमध्ये देखील अत्यंत लोकप्रिय आहेत. नव्या वर्षाकरता बाजारात दाखल झालेल्या त्यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेली एक दिनदर्शिका जपानमध्ये मोठय़ा प्रमाणात विकली जात आहे. या दिनदर्शिकेत सेलिजर सरोवरातील त्यांच्या स्नानाचे आणि व्यायामशाळेत पुतीन घाम गाळत असतानाची छायाचित्रे सामील आहेत. जपानमध्ये 66 वर्षीय रशियन राष्ट्रपतींची छायाचित्रे असलेल्या दिनदर्शिकेला मोठी मागणी असल्याचे चेनस्टोअर द लॉफ्टने सांगितले आहे. या दिनदर्शिकेने विक्री प्रकरणी जपानचे प्रसिद्ध अभिनेते केई तनाका आणि ऑलिम्पिक चॅम्पियन युजुरु हानयू यांच्या दिनदर्शिकेला देखील मागे टाकल्याचे समोर आले आहे.

मागील वर्षी देखील बर्फात स्वतःच्या पाळीव श्वानांसोबत खेळतानाचे पुतीन यांचे छायाचित्र असलेली दिनदर्शिका जपानमध्ये लोकप्रिय ठरली होती. यातील एक श्वानाचे पिल्लू त्यांना जपानच्या एका गव्हर्नराने भेटीदाखल दिले होते.