|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आयुक्त मुंबईत अन् 100 कोटींचा प्रस्ताव मनपातच

आयुक्त मुंबईत अन् 100 कोटींचा प्रस्ताव मनपातच 

प्रतिनिधी/ सांगली

मनपाक्षेत्रातील विकासकामांचा तयार करण्यात आलेले सुमारे 128 कोटींचे अंतिम प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे मंगळवारी पाठविण्यात येणार होता. मात्र यादीच तयार नसल्याने प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. त्यामुळे प्रस्ताव न घेताच आयुक्त मुंबईत पोहोचले आहेत. दरम्यान, प्रस्तावाची यादी तयार झाली नसल्याने हा प्रस्ताव लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा क्षेत्रातील विकासकामांसाठी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले होते. या विकासकामांची यादी तयार करून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार सत्ताधाऱयांनी प्रस्ताव तयार केला आहे. 128 कोटीच्या विकासकामांच्या प्रस्तावाला स्थायीत मंजुरी घेतली आहे. प्रस्ताव मंजुरीला विलंब लागू नये यासाठी स्वतः आयुक्त हा प्रस्ताव घेऊन मंगळवारी मुंबईला जाणार होते. मात्र ते मुंबईला गेले मात्र प्रस्ताव मनपातच राहिला असल्याचे सांगण्यात आले.

 विरोधी नगरसेवकांची कामे घेण्यात आली नसल्याने त्यांनी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे त्यांच्याही कामांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात येत आहेत. ही सर्व कामे एकत्र करून शासनाकडे पाठविण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून हे काम सुरू आहे. प्रस्ताव अंतिम झाला नसल्याने शासनाकडे पाठविण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

बाजारात तुरी अन्…

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी इतका निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. तेही नगरोत्थान योजनेतून. या यानुसार 70 कोटी मनपाला मिळतील. असे असताना सत्ताधाऱयांनी 128 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये आणखी वाढच होत असून प्रस्ताव 140 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवित येत आहे. असे झाल्यास वरच्या 70 कोटींचे काय करायचे हा प्रश्न आहे. ‘बाजारात तुरी अन्…’ अशी अवस्था सत्ताधारी आणि विरोधकांची झाली आहे. जर मुख्यमंत्र्यांनी हेड बदलून तसेच जादा निधी मंजूर केला तरच मनपाने सुचविलेली कामे मार्गी लागतील अन्यथा प्रस्तावातील निम्मीही कामे होणार नाहीत.