|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मर्दा टॉवेल कारखान्यात अग्नीतांडव

मर्दा टॉवेल कारखान्यात अग्नीतांडव 

सोलापूर / प्रतिनिधी

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील मर्दा एंटेक या टॉवेल कारखान्यास लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण करीत बुधवारी अग्नी तांडव केले. पाच तास धुमसत असलेल्या आगीत साधारण 50 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दल व खाजगी अशा सुमारे 50 गाडय़ा पाणी मारुन आग आटोक्यात आणण्यात आली.

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील श्रीनिवास स्पिनिंग मिल समोरील मर्दा टॉवेल कारखान्यात बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास आग लागली. कारखान्यातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याने, एमआयडीसीतील कामगारांनी अग्निशामक दलास याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे लोळ कारखान्यातून मोठय़ा प्रमाणात बाहेर पडत होते. आगीने कारखान्यातील पत्र्याचे शेड कोसळले. यामुळे त्याखाली टॉवेल, कच्चा माल अडकून पडल्याने आग आटोक्यात आणताना जवानांना अडचणीचे ठरत होते. त्यामुळे त्यांनी दोन जेसीबी मशिन मागविले. जेसीबीच्या सहाय्याने टॉवेल व कच्च्या मालाच्या ढिगाऱयावार पडलेले पत्रे हटविण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी मारुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आणण्यात जवानांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याही परिस्थितीत जवानांनी प्रयत्न सुरुच ठेवले होते.

सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आग धुमसत होती. चार वाजण्याच्या सुमारास आग अखेर आटोक्यात आली. टॉवेल, सुतकोल, प्लॅस्टिक पुठ्ठे, पंचिग मशिन कार्ड आदींमुळे आग भडकली असल्याचे सांगण्यात आले. टॉवेल कारखान्यास नेमक्या कोणत्या कारणाने आग लागली याचा उलगडा होऊ शकला नाही. कारण बुधवार सुट्टीचा दिवस असल्याने कारखान्यातील विद्युत उपकरणे बंद करण्यात आली होती अशी चर्चा घटनास्थळी होती. सुट्टीचा दिवस असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

अग्निशामक दलाच्या 35 तर खाजगी पाणीपुरवठा करणाऱया 15 गाड्यातून  पाणी मारुन आग आटोक्यात आणण्यात दलाचे 24 जवान शर्थीचे प्रयत्न करुन  अखेर चार वाजण्याच्या सुमारास त्यांना यश आले. कारखाना मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आज याविषयावर बोलण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले.

कारखान्यात अग्निशमन यंत्रणा नाही

मर्दा टॉवेल कारखान्यात आग लागली तेव्हा अग्निशमन यंत्रणा नसल्याचे दिसून  आल्याचे दलाच्या वतीने सांगण्यात आले. हायटेक अग्निशमन यंत्रणा असती तर होणारे नुकसान मोठय़ा प्रमाणात टळले असते अशी चर्चा होती.

Related posts: