|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वेगीं कां गभस्ती उगवला

वेगीं कां गभस्ती उगवला 

भगवान श्रीकृष्ण उद्धवाला पुढे सांगतात – हरीच्या रंगामध्ये रंगलेल्या भक्तावर त्या मदनाचे बाण प्रहार करू शकत नाहीत.

जेथ मी क्रीडें आत्मारामू । तेथ केवीं रिघे बापुडा कामू ।माझे कामें गोपिका निष्कामू । कामसंभ्रमू त्यां नाहीं ।जो कोणी स्मरे माझें नामू । तिकडे पाहूं न शके कामू ।जेथ मी रमें पुरुषोत्तमू । तेथ कामकर्म। रिघेना ।

एकनाथ महाराज श्रीमुखातून वर्णन करतात – जेथे मी आत्मानंदात रममाण होणारा परमात्मा क्रीडा करतो तेथे हा बापडा मदन कसा प्रवेश करू शकेल? माझ्या कामाने गोपिका निष्काम झाल्या. त्यांना कामविकार निर्माणच झाला नाही. जो कोणी माझ्या नामाचे स्मरण करतो, त्यांच्याकडे हा मदन पाहू देखील शकत नाही. ज्या रासक्रीडेत मी पुरुषोत्तम रममाण होतो तेथे मदनाचे कोणतेही कार्य प्रवेश करू शकत नाही. कामू म्हणे कटकटा । अभाग्य भाग्यें झालों मोटा। रासक्रीडेचिया शेवटील गोटा। आज मी करंटा न पवेंचि ।देखोनि रासक्रीडा गोमटी । काम घटघटां लाळ घोटी ।लाज सांडूनि जन्मला पोटीं । त्या सुखाचे भेटीलागोनि ।तो काम म्यां आपुले अंकीं। केला निजभावें निजसुखी ।तें माझें निजसुख गोपिकीं । रासमिषें कीं भोगिलें । मदन म्हणाला – हाय! हाय! मी भाग्याने जितका मोठा झालो, अनेक कामुकांशी युद्ध करून मी जितका मोठय़ा भाग्यावर चढलो; तितकाच रासक्रीडेच्या बाबतीत अभागी ठरलो. रासक्रीडेच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत देखील मी कपाळकरंटा त्या रासमंडळांत प्रवेश करू शकलो नाही. अनेक गोपिकांपैकी एकाही गोपिकेशी किंवा श्रीकृष्णाशी युद्ध करू शकलो नाही. ह्या वृदावनातील अलौकिक व सुंदर रासक्रिडा पाहून मदन हा घटघटा लाळ घोटीत होता. पण त्याला जे सुख प्राप्त झाले नाही, ते सुख प्राप्त करून घेण्याकरिता त्याने प्रद्युम्नाच्या रूपाने माझ्या पोटी जन्म घेतला. त्या मदनाला मी माझ्या मांडीवर घेतले आणि प्रेमाने माझ्या सुखाने त्याला सुखी केले. सारांश, गोपिकांनी रासक्रीडेच्या निमित्ताने माझेच सुख भोगले. ते रासक्रीडेची राती । म्यां ब्रह्मषण्मास केली होती । गोपिका अर्धक्षणमानिती। वेगीं कां गभस्ती उगवला। जेथ माझा क्रीडासुखकल्लोळ ।

तेथ कोण स्मरे काळवेळ ।

गोपिकांचें भाग्य प्रबळ ।

माझें सुख केवळ पावल्या।

ऐशा माझिया संगतीं। भोगिल्या राती नेणों किती । तरी त्यांसी नव्हे तृप्ती । चढती प्रीती मजलागीं ।

ती रासक्रीडेची रात्र मी ब्रह्मदेवाच्या सहा महिन्यांएवढी ( ब्रह्मदेवाच्या अहोरात्र मध्ये 8640000000 इतकी सौरवर्षे होतात. या संख्येला 180 ने गुणल्यावर येतील इतके दिवस, इतका काळ ) केली. पण गोपिका मात्र एवढय़ा प्रदीर्घ रात्रीला देखील अर्धक्षण मानू लागल्या. इतक्मया लवकर सूर्याचा उदय का झाला, असे त्या म्हणू लागल्या. जेथे माझ्या क्रीडेच्या सुखाच्या लाटा उसळत असतात, तेथे कोणाला काळवेळाचे स्मरण होणार आहे? गोपिकांचे भाग्य फार मोठे म्हणूनच त्या माझ्या शुद्ध सुखाला प्राप्त झाल्या.