|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिहारमध्ये रालोआचा 17-17-6 फॉर्म्युला

बिहारमध्ये रालोआचा 17-17-6 फॉर्म्युला 

भाजप-जेडीयू-एलजेपीचे जागावाटपावर एकमत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अलिकडेच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. बिहारमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रालोआचे जागावाटप निश्चित झाले आहे. दीर्घ चर्चेनंतर भाजप-जेडीयू 17-17 आणि एलजेपी 6 लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याचे निश्चित झाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर भाजप-जेडीयू-एलजेपी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर शाह यांनी 2019 मध्ये 2014 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि त्यांचा मुलगा खासदार चिराग पासवान हेही उपस्थित होते. नितीशकुमार यांनी रालोआ बिहारमध्ये 2009 पेक्षाही जास्त जागी विजयी होईल, असे स्पष्ट केले. तसेच उमेदवारांची निवड आम्ही सर्वजण मिळून निश्चित करणार असून आज जागानिश्चिती झाल्याचे सांगितले. युतीमध्ये सर्व काही ठीक असून पुढे ही व्यवस्थित असेल, असा दावा रामविलास पासवान यांनी केला. रविवारी पत्रकार परिषदेत पासवान यांनी जागावाटपाचा तिढा लवकर सोडविल्याबद्दल अमित शाह, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि अरुण जेटली यांचे आभार मानले.