|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » यवतमाळ साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल

यवतमाळ साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल 

 

पुणे / प्रतिनिधी:

यवतमाळ येथे होणाऱया 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये चार परिसंवाद, मान्यवर कवींचे कवितावाचन, वऱहाडी बोली कविसंमेलन, टॉक शो, प्रकट मुलाखत, चर्चासत्रे, ललित गद्यानुभव, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारीदरम्यान नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी 4 वाजता पोस्टल ग्राऊंड, समता मैदान येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व यवतमाळ जिह्याचे पालकमंत्री मदन येरावार आदी उपस्थित असतील.

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी 8 वाजता आझाद मैदानावरून भव्य ग्रंथदिंडी निघणार असून, ती संमेलनस्थळापर्यंत जाईल. संमेलनाच्या उद्घाटनानंतर सायंकाळी 7.30 वाजता कविसंमेलन होईल. तर कविकट्टय़ाचे उद्घाटन सायंकाळी 7.15 वाजता संमेलानध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे करतील. शनिवारी 9 ते 11 यावेळेत ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्य संपदेचा वेध घेणारा ‘गदिमायन’ हा सांगितीक कार्यक्रम सादर होणार आहे. तर ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ व ‘सत्वशील समाजघडणीसाठी आज महानुभाव, वारकरी आणि बसवेश्वर विचारांची गरज’ या विषयावर परिसंवाद होतील. ‘माध्यमांची स्वायत्तताः नेमकी कोणाची’ या विषयावर ‘टॉक शो, ‘वऱहाडी बोली कविसंमेलन’ तसेच विदर्भ व मराठवाडय़ातील नामवंत कवींच्या कवितांवर आधारित कार्यक्रमही होणार आहे.

नितीन गडकरींच्या हस्ते समारोप

रविवारी 13 जानेवारीला ‘साहित्यकेंद्री अभ्यासक्रमांमुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था’ हा परिसंवाद होईल. दुपारी ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत तसेच ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ हा परिसंवाद होणार आहे. ‘नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा’ हा चर्चात्मक कार्यक्रमही होणार असून, दुपारी 4.30 वाजता मुख्य मंडपात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.

संमेलन परिसराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव

संपूर्ण संमेलन परिसराला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले असून, संमेलनाच्या मुख्य मंडपाला ‘शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर’ असे नाव देण्यात आले आहे. अन्य कार्यक्रमस्थळाला ‘डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह’ तसेच ग्रंथ प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारांना डॉ. वि. भि. कोलते, डॉ. भाऊ मांडवकर, सुधाकरराव नाईक, पृथ्वीगीर हरीगीर गोसावी यांची नावे देण्यात आली आहेत. मुख्य मंडपातील व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर विचारपीठ नाव देण्यात आले आहे. दुसऱया स्थळावरील व्यासपीठाला ‘प्रा. शरच्चंद्र टोंगो’ विचारपीठ, तर ग्रंथ प्रदर्शनाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलन स्थळाच्या सभागृहांच्या प्रवेशद्वाराला वा. ना. देशपांडे, ताराबाई शिंदे, तर मुख्य मंडपाला ‘संत गाडगेबाबा परिसर’ संबोधण्यात येणार आहे.