|Thursday, February 27, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वन्य जीवांची जगभर खालावणारी संख्या

वन्य जीवांची जगभर खालावणारी संख्या 

आज मानवी समाजाची संख्या जगभर वाढत चालली असून त्या तुलनेत वन्यजीवांची संख्या मात्र रोडावत चालली आहे. ही चिंताजनक बाब आहे. एकेकाळी मानव आणि वन्यजीव यांच्यात असलेले सौहार्दाचे संबंध बऱयाच ठिकाणी विस्कळीत झालेले असून, वन्यजीव आणि मानव यांच्यातला तणाव मात्र दिवसेंदिवस शिगेला पोहोचू लागला आहे. वन्यजीव आणि मानव यांचे अस्तित्व खरेतर एकमेकांसाठी पुरक असून त्याचे विस्मरण मानवी समाजाला होत आहे. विश्व प्रकृती निधीच्या आंतरराष्ट्रीय विभागामार्फत ‘सजीव ग्रह’ अहवालानुसार 1970 पासून जगभरातील वन्यजीवांची संख्या 60 टक्क्यांनी कमी झालेली आहे. मानवी समाजाने आज विकासाच्या ज्या नमुन्याचे अवलंबन आरंभिलेले आहे, ते अशाश्वत आहे. मानवाची  भोगलालसा इतकी वाढत चालली आहे की, त्यामुळे सागरी प्राणी, पक्षी, सस्तन, सरपटणारे आणि उभयचर प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जगभरातल्या कणायुक्त 4,005 प्रजातीच्या 16,704 प्राण्यांचे सर्वेक्षण केले असता वन्यजीवांची झपाटय़ाने खालावत जाणारी संख्या ही खेदजनक बाब आहे. उष्णकटिबंध प्रदेशात 89 टक्क्यांनी ही संख्या खालावलेली आहे. हे प्रमाण अन्य प्रदेशांच्या तुलनेत खूपच मोठे आहे. लॅटिन अमेरिका त्याचप्रमाणे पॅरिबियन प्रदेशांतही वन्यजीवांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे.

आज जगभर मानवी समाजाने आरंभिलेल्या जंगल तोड, जंगली श्वापदांची शिकार, वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण, नानाविध विकास प्रकल्पांची होणारी अंमलबजावणी या वावटळीत वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत चाललेला आहे. एकेकाळी ब्राझीलमधील ऍमेझोन नदीचे खोरे मोठय़ा प्रमाणात मानवी समाजापासून अस्पर्श होते. तिथले वन्यजीव मानवी समाजाच्या हस्तक्षेपाविना सुरक्षित होते परंतु आज ऍमेझोन खोऱयातील स्थिती झपाटय़ाने बदलत चालली आहे. एकेकाळी जगभरातल्या प्रगत राष्ट्रांनी विकासाच्या ज्या आराखडय़ाचे अवलंबन केले, त्याचेच अंधानुकरण विकसनशील राष्ट्रांनी आरंभिल्याने तेथील घनदाट जंगले, निर्मळ पाण्याच्या बारामाही सतत वाहणाऱया नद्या, चवदार पाण्याचे तलाव आणि झरे प्रदूषणाची शिकार ठरलेल्या आहेत आणि तेथील वन्यजीवांचे जगणे असंख्य समस्यांच्या वावटळीत सापडून त्यांची संख्या खालावत चालली आहे.

एकेकाळी पृथ्वीतलावरच्या असंख्य जलचरांचे आश्रयस्थान असलेले गोडय़ा पाण्याचे स्रोत मानवाच्या बेधुंद आणि बेशिस्त व्यवहारापायी प्रदूषित झालेले आहेत आणि त्यामुळेच अशा ठिकाणी वास्तव्य करणारे जलचर आणि त्यांच्या खाद्यान्नावरती अवलंबून असणाऱया वन्यजीवांचे आरोग्य संकटग्रस्त झालेले आहे. 1970 ते आजतागायत गोडय़ा पाण्यातल्या वन्यजीवांची संख्या 83 टक्क्यांनी कमी झालेली आहे. मानवी समाजाने पिण्याचे पाणी, जलसिंचन, जलविद्युत निर्मितीसाठी गेल्या अर्धशतकापासून बारामाही वाहणाऱया नद्या, मोठमोठी धरणे उभारून आणि पाट, कालवे यांची महत्त्वाकांक्षी योजना राबवून बंदिस्त केल्याने त्या परिसरातील जलचरांवरती इतिहासजमा होण्याची पाळी आलेली आहे. महाकाय धरणामुळे निर्माण झालेल्या विस्तीर्ण जलाशयात गावोगावी आढळणारे मासे आणि अन्य जलचर संकटग्रस्त झालेले आहेत. बऱयाच ठिकाणच्या जलाशयात व्यावसायिक तत्त्वांवरती स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता नव्या माश्यांच्या प्रजातींची पैदासी आरंभिल्या कारणाने इथे आढळणाऱया चवदार, पौष्टिक माश्यांच्या प्रजाती नामशेष झालेल्या आहेत.

अशा पार्श्वभूमीवर आज जागतिक तापमान वाढ दीड डिग्री सेल्सियसने होऊ लागलेली आहे. या वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम आपल्या परिसरातील पर्यावरण त्याचप्रमाणे त्यांच्या परिसंस्थेवरती प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. सागरात आढळणाऱया प्रवाळावरती तापमान वाढीचे संकट कोसळल्याने, त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीत आढळणाऱया प्रत्येक प्राणीमात्राला जगण्याचा अधिकार असताना, आम्ही दिवसेंदिवस आपमतलबी होऊन त्यांचे अस्तित्व समूळ नष्ट झाले तरी चालेल, आमचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यात दंग झालो आहोत. बऱयाच ठिकाणी वन्यजीवाच्या नैसर्गिक अधिवासावरती संकटांची मालिका कार्यान्वित झाल्याने हे वन्यजीव, लोकवस्ती, शेती-बागायती त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतींच्या आसपास वावरू लागल्या कारणाने त्यांची संख्या वाढली आहे, असा गैरसमज आम्ही करून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा आमच्या जवळपास होत असलेला वावर आम्हाला नव्या संकटासारखा वाटू लागलेला आहे.

आज वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावरती अतिक्रमणे वाढू लागलेली आहेत. अमर्यादपणे जंगलतोड होऊ लागली आहे. मांस, कातडी, हाडे, नखे, दात आणि औषधी गुणधर्म असल्याचा गैरसमज करून जंगली श्वापदांची शिकार करण्याच्या प्रमाणात वृद्धी होऊ लागली आहे. चीनसारख्या देशाने पारंपरिक औषधात गेंडय़ाचे शिंग आणि पट्टेरी वाघाच्या हाडाचा उपयोग करण्याच्या परंपरेवर जी 25 वर्षापूर्वी बंदी घातली होती, ती हटविण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोबर 2018 मध्ये घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात जगभरातील वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताच, चीनच्या सरकारने आपला निर्णय तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक औषधासाठी गेंडय़ांची शिंगे, वाघांची हाडे, घोरपडीचे रक्त वापरण्याची पद्धत ही वन्यजीवांच्या अस्तित्वावरती घाला घालणारी आहे परंतु आज छुप्यारितीने गेंडय़ांची, पट्टेरी वाघ, घोरपड यासारख्या जंगली श्वापदाची हत्या करण्याची कृत्ये शिकारी आरंभित आहेत आणि त्यामुळे काझिरंगासारख्या राष्ट्रीय उद्यानात एक शिंगी गेंडय़ासारख्या प्राण्याचे अस्तित्व संकटग्रस्त झालेले आहे.

गुजरातमध्ये विषाणुच्या प्रभावात गीर राष्ट्रीय उद्यानातील सिंह मृत्यूमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे या सिंहाचे मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात स्थलांतर करण्याचा प्रस्ताव गुजराती जनतेच्या विरोधामुळे मूर्तस्वरुपात येऊ शकलेला नाही. महाराष्ट्रातील जंगलातला मानव आणि पट्टेरी वाघ यांच्यातला संघर्ष विकोपाला जाऊन, त्याचे दुष्परिणाम त्या परिसरातल्या मानवी समाजाबरोबर पट्टेरी वाघांनाही भोगावे लागलेले आहे. विश्व प्रकृती निधीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे संचालक मार्को लॅम्बर्टीनी यांनी या झपाटय़ाने कमी होत जाणाऱया वन्यजीवांच्या संख्येसंदर्भात गंभीर चिंता व्यक्त करून, ही आणीबाणीसारखी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यापूर्वी पॅरीस येथे संपन्न झालेल्या हवामान परिषदेत घेतलेल्या निर्णयासारखे कृती कार्यक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलेले आहे. वन्यजीवांच्या रोडावत चाललेल्या संख्येत सुधारणा होण्यासाठी जगभरातील सरकारांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे दुष्परिणाम मानवी समाजाला भोगण्याची पाळी येणार आहे.

Related posts: