|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफिकचा राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा

‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफिकचा राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

नुकत्याच जालना येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत बुलढाण्याच्या बाला रफिकने पुण्याच्या अभिजित कटकेवर 11 विरुध्द 3 गुणांनी एकतर्फी मात करून ‘महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब पटकविला. यानंतर त्याने पहिल्यांदा कोल्हापूरला भेट देऊन राजर्षी शाहूंना अभिवादन करुन मानाचा मुजरा केला. न्यू मोतीबाग तालमीच्या सहकारी मल्लांनी त्याचे दसरा चौकात जल्लोषी स्वागत करून सत्कार केला. 

   यावेळी बोलताना महाराष्ट्र केसरी बाला रफीक म्हणाला, महाराष्ट्र केसरीचा किताब वस्ताद हिंद केसरी कै.गणपतराव आंदळकर यांना अर्पण केला आहे. हा मानाचा किताब पटकवून मी माझे वडील व स्वर्गीय वस्ताद गणपतराव आंदळकर यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. न्यू मोतीबाग तालमीमध्ये आंदळकरांच्या  मार्गदर्शनाखाली सहकारी मल्लांबरोबर सरावातून कुस्तीतील डावपेच शिकायला मिळाले. कठोर परिश्रमाच्या जोरावर ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकविणे सहज शक्य झाले. आता पुढील महिन्यात 28 जानेंवारी 2019 रोजी होणाऱया हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची तयारीला प्राधान्य देणार असल्याचेही यावेळी त्याने सांगितले.

  दसरा चौकात महाराष्ट्र केसरी बाला रफिकचे स्वागत केल्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. ही मिरवणुक पुढे बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे न्यू मोतीबाग तालीम येथे नेण्यात आली. यावेळी बाला रफिकचा भाऊ लखन शेख, डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, उपमहाराष्ट्र केसरी वस्ताद बाळू पाटील, नंदू अबदार, हिंद केसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचे चिरंजीव अभिजित आंदळकर, मारुती जाधव, अविनाश पाटील, भरत लोकरे,   संजय पाटील, अनिल बोरकर, मारुती जाधव, बाबुराव मोहिते, म्हादू सावकार, संभाजी मोहिते, सागर साळोखे, उमेश पाटील, सचिन पाटील, वैभव पाटील आदींसह न्यू मोतीबाग तालमीचे सहकारी मल्ल मोठया संख्येने उपस्थित होते.