|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सतीश जारकीहोळींकडे वनखाते

सतीश जारकीहोळींकडे वनखाते 

प्रतिनिधी /बेंगळूर :

गृह खात्याच्या मागणीवर आडून बसलेले काँगेस नेते एम. बी. पाटील यांची अपेक्षापूर्ती झाली आहे. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याजवळील हे खाते एम. बी. पाटील यांना मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना यश आले आहे. तर रमेश जारकीहोळी यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांचे बंधू सतीश जारकीहोळी यांना स्थान देण्यात आले होते. सतीश जारकीहोळी यांच्यावर वनखात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मागील आठवडय़ात राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. यावेळी दोघांना वगळून 8 जणांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले होते. मात्र 5 दिवस उलटले तरी नूतन मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले नव्हते. खाते वाटपावरून निर्माण झालेला गोंधळ दिल्ली दरबारी पोहोचला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून खातेवाटपाचा तिढा सोडविला आहे.

आमदार एम. बी. पाटील यांना गृहखाते मिळवून देण्यासाठी सिद्धरामय्या यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना आपल्या जवळील गृहखाते नाईलाजाने एम. बी. पाटील यांना द्यावे लागले. परंतु बेंगळूर शहर विकास खाते आपल्याजवळ ठेवून घेण्यात परमेश्वर यशस्वी ठरले आहेत. याचवेळी कायदा आणि संसदीय खाते त्यांना देण्यात आले आहे.

पाटबंधारे खात्याची जबाबदारी सांभाळणारे डी. के. शिवकुमार यांच्याजवळील वैद्यकीय शिक्षणखाते काढून घेऊन ई. तुकाराम यांना देण्यात आले आहे. त्यामुळे डी. के. शिवकुमार नाराज झाले आहेत.

खातेवाटप असे…

एम. बी. पाटील – गृह खाते

आर. बी. तिम्मापूर – कौशल्यविकास

सतीश जारकीहोळी – वनखाते

एम. टी. बी. नागराज – गृहनिर्माण

सी. एस. शिवळ्ळी – नगरप्रशासन, बंदरविकास

रहिम खान – युवजन सेवा-क्रीडा

ई. तुकाराम – वैद्यकीय शिक्षण

परमेश्वर नायक – धर्मादाय, आयटी-बीटी