|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादीकडून नाणार रिफायनरीचे समर्थन

राष्ट्रवादीकडून नाणार रिफायनरीचे समर्थन 

चिपळूण

राज्यकर्ते कुणीही असोत, प्रकल्प आणताना कोणीही तेथील परिसर भकास करण्यासाठी तो आणत नाहीत. सध्यस्थितीत तंत्रज्ञान खूप पुढे गेलेले आहे. त्यामुळे कुणीही राज्यकर्ते भकास करणारे उद्योग आणून स्वत:चे नुकसान कसे करून घेऊ शकतात? त्यामुळे काहीजण फक्त गैरसमज पसरवण्याचे काम करतात. एन्रॉनच्या बाबतीत जे झाले, तेच रिफायनरीबाबत होत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी येथे सांगत रिफायनरीला जाहीरपणे समर्थन देत प्रकल्पाचे समर्थन करणाऱया भाजपच्या सुरात सूर मिळवला आहे.

परिवर्तन निर्धार यात्रेच्या निमित्ताने येथे राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री पवारांसह उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे विरोधी गटनेते धनंजय मुंढे, आमदार भास्कर जाधव आदेंच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्या येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 चांगले प्रकल्प आले पाहिजेत

 नाणार रिफायनरीसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, एन्रॉनला विरोध करताना या प्रकल्पामुळे कोकण भकास होईल, फळबागा उद्ध्वस्त होतील, असे गैरसमज पसरवण्यात आले. मात्र प्रकल्प झाल्यावर यापैकी काहीच झालेले नाही. तसेच आता रिफायनरीबाबत घडत आहे. विकासाच्यादृष्टीने राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली असून यापुढेही राहणार आहे. कोणत्याही प्रकल्पाला विरोध झाला तर कोणत्या कारणाला हा विरोध आहे, हे ओळखून ते समजून सांगण्याचे काम करणे गरजेचे आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी चांगले प्रकल्प आले पाहिजेत. इथे काही झाले तरी फळबाग, मत्स्य आणि पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार असे प्रकल्प येणे गरजेचे आहे. यातून कोकणाला अधिक पाठबळ कसे देता येईल, असेच आमचे प्रयत्न आहेत.

   शिवसेनेसह भाजपलाही पर्याय राहिलेला नाही

शिवसेना युतीतून कधीही बाहेर पडणार नाही. टीका करून केवळ ते आपली किंमत वाढवत आहेत. युती केल्याशिवाय शिवसेनेसह भाजपलाही पर्याय राहिलेला नसल्याने ते स्वतंत्र लढूच शकत नाहीत. त्यामुळे युती दोघांनाही करावीच लागेल. निवडून आल्यानंतर सुरूवातीला शिवसेना बॅकफूटवर होती आणि भाजप आपल्याला हवं होतं तसं करीत होती. मात्र आता 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपच पराभव झाल्यानंतर असलेली शिवसेना पुढे गेली आणि भाजपा मागे पडली आहे. या दोघांची युती होणार आणि कदाचित दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर आश्चर्य वाटण्यासारखे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  भाजपकडून नुसती पोपटपंची

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर येण्यासाठी केवळ भाजपने नुसती पोपटपंची केली असून दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. प्रकल्पाना चालना न दिल्याने बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यासाठी सत्तेत परिवर्तन व्हावे, यासाठी काढण्यात येत असलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेस कोकणात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील प्रत्येक प्रांतात आम्ही जात आहोत. आरक्षण हा भाजपचा सत्ता टिकवण्याच्यादृष्टीने शेवटचा प्रयोग आहे. मात्र कोर्टात टिकले तरच ते आरक्षण मिळणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पंचायत समिती सभापती पूजा निकम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शौकत मुकादम आदी उपस्थित होते.

 

Related posts: