|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » वासीम जाफर, रामास्वामीची नाबाद शतके

वासीम जाफर, रामास्वामीची नाबाद शतके 

रणजी चषक : उत्तराखंडच्या 355 धावांना उत्तर देताना विदर्भाच्या 1 बाद 260 धावा

वृत्तसंस्था/ नागपूर

येथे सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेतील उत्तराखंडविरुद्ध लढतीत विदर्भाने दुसऱया दिवसअखेरीस 69 षटकांत 1 बाद 260 धावा केल्या होत्या. अनुभवी फलंदाज वासीम जाफर (नाबाद 111) व संजय रामास्वामी (नाबाद 112) यांनी नाबाद शतक झळकावत दुसऱया दिवशीचा दिवस गाजवला. विदर्भाचा संघ अद्याप 95 धावांनी पिछाडीवर आहे. उत्तराखंडचा पहिला डाव 355 धावांवर आटोपला.

प्रारंभी, उत्तराखंडने 6 बाद 293 धावसंख्येवरुन दुसऱया दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण, अवघ्या 62 धावांची भर घातल्यानंतर त्यांचा पहिला डाव 108.4 षटकांत 355 धावांवर संपुष्टात आला. उत्तराखंडकडून सौरभ रावतने सर्वाधिक 108 धावांचे योगदान दिले. अवनीश सुधाने 91 तर वैभव सिंगने 67 धावा फटकावल्या. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरल्याने उत्तराखंडला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. विदर्भाकडून उमेश यादवने 4 तर रजनीश गुरबानी व अक्षय वाखरे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरातदाखल खेळताना विदर्भाची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर फैज फैजल 29 धावा काढून बाद झाला. यानंतर, अनुभवी वासीम जाफर व संजय रामास्वामी यांनी दुसऱया गडय़ासाठी 215 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. जाफरने शानदार शतकी खेळी साकारताना 153 चेंडूत 13 चौकारासह नाबाद 111 धावा केल्या. रामास्वामीनेही शतकी खेळी साकारताना 16 चौकारासह नाबाद 112 धावांचे योगदान दिले. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भाने 69 षटकांत 1 गडी गमावत 260 धावा केल्या होत्या. विदर्भाचा संघ अद्याप 95 धावांनी पिछाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक : उत्तराखंड प.डाव 108.4 षटकांत सर्वबाद 355 (सौरभ रावत 108, वैभव सिंग 67, अवनीश सुदा 91, रजनीश गुरबानी 2/81, उमेश यादव 4/90).

विदर्भ प.डाव 69 षटकांत 1 बाद 260 (फैज फैजल 29, वासीम जाफर खेळत आहे 112, संजय रामास्वामी खेळत आहे 111, दीपक 1/45).

 

राजस्थान-कर्नाटक सामना रोमांचक स्थितीत

बेंगळूर : रणजी चषक स्पर्धेतील राजस्थान व कर्नाटक यांच्यातील सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. राजस्थानचा पहिला डाव 224 धावांत आटोपला. यानंतर कर्नाटकलाही पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली नाही. त्यांचा पहिला डाव 263 धावांत संपुष्टात आला. कर्नाटककडून विनय कुमारने नाबाद 83 तर सिद्धार्थने 52 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून दीपक चहरने 5 गडी बाद केले. दुसऱया डावात खेळतान राजस्थानने दिवसअखेरीस बिनबाद 11 धावा केल्या होत्या. राजस्थानचा संघ अद्याप 28 धावांनी पिछाडीवर आहे.

 

Related posts: