|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मेघालय : खाणीतून एक मृतदेह हस्तगत

मेघालय : खाणीतून एक मृतदेह हस्तगत 

शिलाँग / वृत्तसंस्था :

मेघालयाच्या पूर्व जयंतीया हिल्स जिल्हय़ातील अवैध खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठीची मोहीम अद्याप सुरू आहे. खाणीच्या 200 फूट खोल भागातून नौदलाच्या पथकाने गुरुवारी एक मृतदेह बाहेर काढला आहे. खाणीत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. खाणीतून आतापर्यंत एक कोटी लीटरहून अधिक पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.

प्लानिज टेक्नॉलॉजी या कंपनीने नौदलाला बचावकार्यात सहकार्य पुरविले आहे. 13 डिसेंबर रोजी मजूर या खाणीत अडकून पडले होते. खाणीजवळून वाहणाऱया लॅटीन नदीचे पाणी आत शिरल्याने मजुरांवर हे संकट ओढवले आहे. या खाणींना रॅट होल म्हटले जाते. राष्ट्रीय हरित लवादाने या खाणींवर बंदी घातली होती, तरीही अवैधमार्गाने तेथे उत्खनन सुरूच असते.

खाणीच्या संचालकाला अटक करण्यात आल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले आहे. आम्हाला चमत्कारावर विश्वास असून मजुरांना सुखरुपपणे खाणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. एका मजुराचा मृतदेह सापडल्याने अन्य मजुरांना वाचविण्याचे प्रयत्न गतिमान करावे लागणार आहेत.

रोबोटिक सबमर्सिबल इन्स्पेक्शनमध्ये तरबेज असलेली कंपनी देखील मजुरांना बाहेर काढण्यासाठी मोहिमेत सहभागी झाली आहे. कंपनीनुसार बचावकार्यात 6 सदस्यीय पथक आणि एक रिमोटने चालणारे वाहन (आरओव्ही) तैनात करण्यात आले आहे.