|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » माहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार

माहिती तंत्रज्ञान खात्याकडून तीन आयटी कंपन्यांशी करार 

प्रतिनिधी /पणजी :

माहिती तंत्रज्ञान खात्याने तीन कंपन्यांशी समन्वय करार केला असून त्याचा कोणताही आर्थिक ताण राज्य सरकारवर तसेच खात्यावर पडणार नाही. करारानुसार त्या कंपन्या  सरकारला आयटी क्षेत्रात पुढे जाण्यासाठी व विविध सेवा देण्याकरिता तत्पर राहणार असल्याची माहिती खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर यांनी दिली.

इंटेल, इंटय़ुईट व इलेव्हेनो-वन या तीन कंपन्यांशी हा करार झाला असून त्याचे प्रतिनिधी अनुक्रमे किशोर बाबाजी, अविनाश पिट्टी, संतोषकुमार हे यावेळी हजर होते. अभ्यंकर आणि या प्रतिनिधींनी कराराच्या फाईलची देवाणघेवाण केली. या करारामुळे गोव्यातील आयटी उद्योगांना प्रोत्साहन मिळणार असून एकंदरीत कारभारात अधिक पारदर्शकता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

डीजिटल वापर वाढणार

रस्ता सुरक्षा तसेच अपघात टाळण्यासाठी हे करार फार महत्त्वाचे ठरणार असून आयटीच्या करारामुळे अपघात रोखणे शक्य होणार असल्याचा दावा अभ्यंकर यांनी केला. आयटी उद्योगाची वाढ तसेच डीजिटलचा वापर यामुळे गोव्यात आयटीचा वापर वाढणार असून स्मार्ट सिटीसाठी देखील या कराराचा फायदा होणार आहे.

अपघात रोखण्यासाठी विशेष उपकरण

दोन वाहनांमधील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाय म्हणून विशेष उपकरण विकसित करण्यात येणार असून ते बसवल्यानंतर अपघात रोखण्यात यश मिळेल आणि गोमंतकीय जनता अधिक सुरक्षीत बनेल, असे अभ्यंकर यांनी नमूद केले. तिन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कंपन्यांची थोडक्यात माहिती देऊन हा करार म्हणजे त्यांच्या कंपन्यांचा मोठा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. या कंपन्या गोवा सरकारशी व पर्यायाने माहिती तंत्रज्ञान खात्याशी भागीदारीने काम करणार असल्याचे सांगण्यात आले.