|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा

सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा 

बेळगाव / प्रतिनिधी :

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी होत असलेला विलंब आम्हा सीमाबांधवांना जीवघेणा ठरत आहे. केंद्र सरकार हैद्राबाद, चंदीगडसारख्या प्रश्नांवर तोडगा काढू शकते, मात्र सीमाप्रश्नी डोळेझाक करते. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करण्याची पावले त्वरित उचलणे गरजेचे आहे, असे विचार शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.

हुतात्मा दिनी येथील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित राहून किरण ठाकुर यांनी आपले विचार मांडले. तत्पूर्वी हुतात्म्यांच्या प्रतिमेसमोर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मूक फेरी काढण्यात आली.

यावेळी बोलताना किरण ठाकुर म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमाबांधवांनी आजवर अनेक लढे दिले आहेत. यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे बलिदानही महत्त्वाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठा लढा उभा करून त्या प्रश्नासाठी प्राणांचे बलिदान दिले. मात्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करताना बेळगाव आणि कारवारचा बळी देण्यात आला. 1969 साली शिवसेनेने छेडलेल्या आंदोलनात 67 हुतात्मे झाले. मात्र, सीमाप्रश्नाची सोडवणूक झाली नाही. महाजन अहवालानेही तोडगा निघू शकला नाही. आता प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला आहे. अशा वेळीदेखील आम्ही लढतो आहोत. सर्वोच्च न्यायालयात प्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित झाला पाहिजे. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार त्यांनी मांडले.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, सीमालढा हा लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेला लढा आहे. या लढाईसाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. या बलिदानाची आणि त्यागाची जाणीव ठेवून आपण ही लढाई सुरू ठेवली पाहिजे.

यावेळी उपमहापौर मधुश्री पुजारी, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शहर म. ए. समितीचे उपाध्यक्ष टी. के. पाटील, सरचिटणीस किरण गावडे, मनपा मराठी गटनेते संजय शिंदे, माजी महापौर महेश नाईक, सरिता पाटील, संज्योत बांदेकर, नगरसेवक पंढरी परब, राजू बिर्जे, मोहन बेळगुंदकर, विजय पाटील, शिवाजी कुडुचकर, विजय भोसले, नगरसेविका माया कडोलकर, रूपा नेसरकर, सुधा भातकांडे, माजी उपमहापौर रेणू मुतगेकर, रेणू किल्लेकर, मीनाक्षी चिगरे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, बाळासाहेब काकतकर, कल्लाप्पा प्रधान, अमर यळ्ळूरकर, गजानन पाटील, सुनील बाळेकुंद्री, सुरेश मळीक नितीन कपिलेश्वरकर आदी उपस्थित होते. ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, जोतिबा आनंदाचे, सुनील जाधव, अंकुश केसरकर, राजू मरवे, शिवाजी हंगिरकर, बबन भोबे, नारायण किटवाडकर, गजानन धामणेकर, पी. के. भागोजी, रवि साळुंखे, नेताजी मणगुतकर, प्रशांत भातकांडे, सतीश गावडोजी, राजू पाटील, परशुराम शहापूरकर आदी उपस्थित होते.

मूक फेरीचे आयोजन

हुतात्म्यांना श्रद्धांजलीनंतर शहरातील रस्त्यांवरून मूक फेरी काढण्यात आली. हुतात्मा चौक येथून सुरू झालेली ही फेरी रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोड या मार्गाने पुन्हा हुतात्मा चौक येथे आली. तेथे तिचे छोटय़ा सभेत रुपांतर झाले.

अनसूरकर गल्ली येथे कै. मधू बांदेकर यांना तसेच किर्लोस्कर रोडवर महादेव बारागडी आणि लक्ष्मण गावडा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेनेतर्फे बारागडी कुटुंबीयांना साडी-चोळी भेटीदाखल देण्यात आली.