|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » मायावतींबद्दल भाजप नेत्याचे अनुद्गार

मायावतींबद्दल भाजप नेत्याचे अनुद्गार 

राष्ट्रीय महिला आयोग बजावणार नोटीस : भाजपनेही नेत्याला फटकारले

वृत्तसंस्था / लखनौ

बसप अध्यक्षा मायावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱया भाजप आमदार साधना सिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या विधानाची दखल घेत भाजप आमदाराला नोटीस बजावण्याची तयारी चालविली आहे. मायावती महिला तसेच पुरुष देखील वाटत नसल्याचे अत्यंत वादग्रस्त विधान साधना यांनी केले होते. साधना सिंग या चंदौली जिल्हय़ाच्या मुगलसराय मतदारसंघाच्या आमदार आहेत.

साधना यांच्या वादग्रस्त विधानाची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निंदा केली आहे. आमचा पक्ष भाजपसोबत असला तरीही मायावतींच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानाशी आम्ही सहमत नाही. मायावती दलित समुदायाच्या नेत्या तसेच उत्तम प्रशासक आहेत, असे उद्गार आठवले यांनी काढले आहेत.

भाजप नेतृत्वाने देखील साधना सिंग यांना याप्रकरणी फटकारले आहे. अशाप्रकारचे विधान  अस्वीकारार्ह असल्याचे भाजपने म्हटले आहे.

भाजपच्या नेत्यांनी मानसिक संतुलन गमाविले आहे. साधना सिंग यांनी बसप अध्यक्षांबद्दल वापरलेले शब्द भाजपची खालावलेली पातळी दर्शवितात. सप-बसप आघाडीच्या घोषणेनंतर भाजप नेत्यांनी मानसिक संतुलन गमाविले आहे. त्यांना आगरा तसेच बरेलीच्या मनोरुग्णालयात दाखल केले जावे, असे बसपचे वरिष्ठ नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे.

भाजपच्या महिला नेत्याने मागितली माफी

 

बसप अध्यक्षा मायावतींबद्दल अनुद्गार काढल्यानंतर भाजपच्या आमदार साधना सिंग यांनी माफी मागितली आहे. माझा उद्देश कोणालाही अपमानित करण्याचा नव्हता. 2 जून 1995 रोजी घडलेल्या गेस्ट हाउस प्रकरणादरम्यान मायावतींना भाजप नेत्यांनी केलेल्या मदतीचे स्मरण करून देण्याचा केवळ माझा प्रयत्न होता. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास मी खेद व्यक्त करत असल्याचे साधना यांनी म्हटले आहे.