|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वाचायला शिकवणारी माणसं

वाचायला शिकवणारी माणसं 

आम्ही नववीत होतो. इंग्रजीच्या श्याम अत्रे सरांनी सुचवले की मी स्नेहसंमेलनात हॅम्लेटचे ‘टु बी ऑर नॉट टु बी’ म्हणावे. तो सबंध उतारा त्यांनी शब्दार्थांसह दिला. मी मुखोद्गत केलाही. पण ऐनवेळी स्टेजवर जायला भ्यालो होतो.

दहावीत मी श्रीकृष्ण वैद्य क्लासेसची शिकवणी लावली होती. जून महिन्यात क्लासेस सुरू झाले. त्यावेळी अकरावीच्या मुलांना इंग्रजीसाठी चार्ल्स डिकन्सची ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ कादंबरी होती. सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण वैद्य सर अकरावीच्या मुलांना त्यावर आधारित असलेला चित्रपट दाखवणार होते. मी सरांपाशी हट्ट धरला की मलाही सिनेमा बघायचा आहे. सरांनी होकार दिला. मी नियोजित वेळेला हजर झालो.

क्लासच्या मुख्य हॉलमध्ये पांढरा पडदा लावला होता. दारामध्ये प्रोजेक्टर उभारला होता. त्या काळी सणासुदीला रस्त्यावर जसे 16 मि. मि. चित्रपट दाखवले जात तसा तो चित्रपट होता. ठीक 12 वाजता हॉलची दारे बंद झाली. दिवे मालवले गेले. चित्रपट सुरू झाला. पहिलं दृष्य अजून स्मरणात आहे. अंधारी रस्ता, पडदानशीन बग्गी येऊन थांबते… मधूनमधून प्रोजेक्टरजवळचा कर्मचारी चित्रपट थांबवीत होता. पडद्याजवळ उभे वैद्य सर माईकवरून समालोचन करीत होते. संवादांचे मराठी रूपांतर आणि इतर तपशील नाटय़पूर्ण आवाजात सांगत होते. चित्रपटाला अनेक मध्यंतरे झाली पाच तासांनी चित्रपट संपला. आयुष्यात पाहिलेला हा पहिला इंग्रजी चित्रपट. एक अद्भूत आणि अविस्मरणीय
अनुभव.

दुसरा अनुभव कॉलेजमध्ये झिया करीम या प्राध्यापिकेने दिला. विल्यम सॉमरसेट मॉमची ‘द मून ऍण्ड सिक्सपेन्स’ कादंबरी शिकवताना मॉमचे काही परिच्छेद त्या स्वतः वाचून दाखवीत. अभिवाचन ही संज्ञा देखील त्यावेळी ऐकली नव्हती. पण त्या वाचून दाखवीत तेव्हा कादंबरीतले दृष्य अगदी जिवंत होऊन डोळय़ांसमोर उभे राही. बऱयाचदा घरी केलेल्या पहिल्या वाचनात न समजलेले अवघड शब्दांचे अर्थ त्यांच्या अभिवाचनात अंदाजाने अचूक लागत. करीम मॅडममुळे मॉम हा एकदम आवडता लेखक झाला. त्या काळात त्याची ‘द नॉ रो कॉर्नर’ ही कादंबरी फूटपाथवर विकत घेऊन वाचली. एखाद्या लेखकाच्या आंधळय़ा प्रेमात पडण्याचा तो पहिलावहिला अनुभव होता. पु. ल. भेटले ते मॉमनंतर. पण आंग्ल वाचनाची गोडी लावणारी आद्य दैवते म्हणजे अत्रे सर, वैद्य सर आणि झिया करीम मॅडम.

Related posts: