|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विरोधकांची मोट

विरोधकांची मोट 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात फुंकलेले रणशिंग म्हणजे राजकीय शक्तिप्रदर्शनच म्हटले पाहिजे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील 22 पक्षांची महाआघाडी पुढे येणे, ही अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण घटना असून, याचे निवडणूक निकालावर निश्चितच परिणाम संभवतात. गत निवडणुकीत मोदी लाटेत भल्याभल्यांचा धुव्वा उडाला. काँग्रेससारख्या सत्ताधारी पक्षाला केवळ 44 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, मागच्या साडेचार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. प्रारंभीच्या काळात मजबूत पकड मिळवत एकापाठोपाठ एक राज्ये पादक्रांत करणाऱया मोदी यांच्या घोडदौडीला पाच राज्यातील निवडणुकीत लगाम बसल्याचे पहायला मिळाले. विविध आघाडय़ांवर सरकार उघडे पडल्यामुळे आज मोदींचा करिष्मा नक्कीच ओसरला आहे. स्वाभाविकच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 282 जागांवर मुसंडी मारणाऱया भाजपालाही या खेपेला स्पष्ट बहुमताची शाश्वती वाटत नसावी. त्यामुळेच एरवी अतिआत्मविश्वासात वावरणारे भाजपवाले कधी नव्हे ते जमिनीवर आल्याचे दिसतात. शिवसेनेसह आपल्या अन्य मित्रपक्षांना गोंजारायची नीती हेदेखील त्याचेच द्योतक ठरते. पिछेहाटीच्या या स्थितीत विरोधकांची एकजूट होण्याने भाजपाची आता चांगलीच कसोटी लागेल, हे लक्षात घ्यायला हवे. आजमितीला तरी भाजपाला दीडशेच्या वर जागा मिळतील का, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. काँग्रेसच्या जागा वाढणार असल्या तरी त्यांना निर्भेळ यश मिळेल, याची तरी हमी कोण देणार? मात्र, मुख्य विरोधी व राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांचे महत्त्व अबाधित राहीलच. भाजपाच्या जवळपास किंवा आगेमागे रहायची ताकद आज तेच बाळगून आहेत. पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक अशी काही महत्त्वाची राज्ये त्यांच्याकडे आहेत. विरोधकांमधील कुणी कितीही आटापिटा केला, तरी 50 च्या पुढे कुठल्याही पक्षाला जागा मिळण्याची सूतराम शक्यता नाही. मग तो ममतांचा तृणमूल असो वा मायावतींचा बसपा असो. भारतीय राजकारणातील ममता बॅनर्जी व मायावती या अत्यंत महत्त्वाकांक्षी नेत्या आहेत. घटक पक्षांचे सरकार आले, तर पंतप्रधानपद होण्याची आस दोघीही बाळगून आहेत. ममतांचा महाआघाडीसाठीचा पुढाकार व मोदींविरोधातील एल्गार हे त्याचेच गमक होय. अर्थात या व्यासपीठावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, बसपाच्या नेत्या मायावती यांनी स्वत: यायचे टाळत आपल्या प्रतिनिधींना धाडले, हेही सूचक मानले पाहिजे. त्यामुळे ममता म्हणतील ती पूर्व दिशा ठरेल, असे मानायचेही कारण नाही. बंगालपुरता विचार केला, तर ममतांना तोड नाही. तेथे भाजपा वा काँग्रेस दोघांचीही डाळ शिजण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. भाजपासाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या युपीत सपा, बसपा एकत्र आले आहेत. अखिलेश यांची उपस्थिती विशेष जाणवली. त्यामुळे 71 जागांवर मजल मारणाऱया भाजपाची गाडी युपीत 50 च्या पुढे तरी जाते का, याविषयी साशंकता वाटते. यात काँग्रेसचे काय, हाही मुद्दा आहेच. बिहारमध्ये मोदी व नितीशकुमार यांचे सख्य झाले असले, तरी शरद यादव यांनी वेगळी चूल मांडली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांचाही अलीकडे प्रभाव वाढलेला दिसतो. या गोष्टी कुठेतरी भाजपा व संयुक्त जनता दलाला अडथळा ठरू शकतात. दिल्लीतील कारभाराने अरविंद केजरीवाल यांनी आपली मांड आधीच पक्की केली आहे. विरोधकांच्या एकीने त्यांचा गड अधिक मजबूत होईल. गुजरातमधील हार्दिक, जिग्नेश व काँग्रेस फॅक्टरने दिलेला दणका अजूनही भाजप विसरला नसेल. लोकसभेतही त्यांचे हातात हात असणे, डोकेदुखीच ठरेल. महाराष्ट्रात सेना-भाजपा व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील युती अटळच म्हणायला हवी. सेना भाजपाची बाजू काहीशी वरचढ मानली जात असली, तरी 48 पैकी 42 जागा मिळविण्याची पुनरावृत्ती आता शक्य नाही. 22 ते 28 जागांपर्यंतच हे यश सीमित राहील, असा अंदाज आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधी सुराने दक्षिणेतील भाजपाचा शून्य अधिक मोठा होण्याचा धोका आहे. कर्नाटक वगळता आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ कुठेच सत्ताधारी पक्षाचा प्रभाव नाही. उलटपक्षी द्रमुकसारखे पक्ष विरोधी आघाडीत जात असतील, तर त्यातून पक्षाला कुठे ना कुठे फटकाच बसू शकेल. ही सगळी वजाबाकी जेथून प्रामुख्याने भरून निघण्याची आशा होती, ती उत्तरेतील अनेक राज्ये काँग्रेसच्या बाजूला झुकल्याने सत्ताधारी निश्चितपणे कोंडीत अडकले आहेत. हा मतदार पुन्हा खेचून आणण्यासाठी मोदींना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. देशाच्या काही भागातून त्यांना नव्याने जागा प्राप्त होतीलही. परंतु, बालेकिल्ल्यातून होणारे नुकसान कसे भरून काढणार, हा पक्षापुढचा सगळय़ात मोठा प्रश्न राहील. कोलकात्यातील महागठबंधन मेळाव्यात अनेक मंडळी सहभागी झालेली पहायला मिळतात. त्यांचे उपद्रवमूल्य नक्कीच छोटे-मोठे असू शकते. त्यामुळे काँग्रेससोबत या सर्वांशीही भाजपाला नेटाने टक्कर द्या वी लागेल. वेगवेगळय़ा प्रश्नांमुळे वेढलेल्या भाजपापुढे नेत्यांच्या आजारपणाचेही आव्हान आहे. मनोहर पर्रीकरांपासून ते अरुण जेटलींपर्यंत अनेक नेत्यांच्या तब्येतीमुळे भाजपात अस्वस्थता आहे. साहजिकच प्रचाराची मदार पुन्हा एकदा मोदी व शहा या जोडगोळीवरच राहील. मोदींची जादू ओसरली असली, तरी संपलेली नाही, याची जाणीव विरोधकांनाही ठेवावी लागेल. तर फक्त विरोधकांमधील फाटाफुटीवर अवलंबून राहून चालणार नाही, याचे भान सत्ताधाऱयांना बाळगावे लागणार आहे. परिस्थिती, संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे अनेकांची स्वप्नेही नव्याने उमलत आहेत. विरोधकांची मोट बांधली गेली असली, तरी निवडणुकीपर्यंत ही एकजूट किती टिकणार, हे महत्त्वपूर्ण ठरेल.