|Thursday, September 19, 2019
You are here: Home » leadingnews » एटीएसची कारवाई ; मुंबई आणि औरंगाबादमधून इसिसशी संबंधित 9 जण ताब्यात

एटीएसची कारवाई ; मुंबई आणि औरंगाबादमधून इसिसशी संबंधित 9 जण ताब्यात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने मुंबईजवळच्या मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये कारवाई करत इसिसच्या नऊ समर्थकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांचे स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर हे लोक कोण आहेत कशा प्रकारे कार्यरत आहेत यावर महाराष्ट्र एटीएसचे लक्ष होते. त्यानंतर मागील दोन दिवसात ही कारवाई करण्यात आली. मुंब्रा या ठिकाणाहून 5 तर औरंगाबादहून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सगळय़ांची एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे. या सगळय़ांचे सोशल मीडिया अकाऊंट आणि इमेल्सही तपासण्यात येत आहेत. इसिसचे काही हस्तक भारतातील तरुणांना चिथावणी देत असतात. काहीजण त्यांनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडतात. याआधीही इसिसशी संबंधित काही जणाना अटक करण्यात आली आहे.

 

गेल्याच महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 16 ठिकाणी छापे घातले होते. दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये संघटनांशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली होती. या सर्च ऑपरेशनमध्ये उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी संघटनांचादेखील सहभाग होता.