|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वाळू माफियांच्या दादागिरीमुळे भीतीचे वातावरण

वाळू माफियांच्या दादागिरीमुळे भीतीचे वातावरण 

सरंबळ ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

उद्ध्वस्त रॅम्प पुन्हा तयार केले

वाळू उत्खनन-वाहतूक दिवस-रात्र सुरू

थांबविण्यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी

..अन्यथा 26 रोजी उपोषणाद्वारे शासनाचा निषेध!

वार्ताहर / कुडाळ:

सरंबळ-भाटीवाडी येथे सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस वापरण्यात येणारे रॅम्प महसूल विभागाने उद्ध्वस्त केले. मात्र, पुन्हा त्याच ठिकाणी रॅम्प तयार करून वाळू उत्खनन व वाहतूक दिवस-रात्र सुरू आहे. वाळू माफिया आपल्या कारवाईला जुमानत नाहीत व शासनाच्या मालमत्तेची राजरोस चोरी करीत आहेत, याकडे सरंबळ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. वाळू माफियांच्या दादागिरीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. हा वाळू उपसा व वाहतूक त्वरित थांबविण्यासाठी कार्यवाही व्हावी. अन्यथा 26 जानेवारी रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसून शासनाचा निषेध करणार आहोत, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सरंबळ खाडीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. अनेकदा संबंधितांच्या निदर्शनास आणूनही आजही शेकडो डंपरनी वाळू वाहतूक राजरोस सुरू आहे. भरवस्तीतून रात्रभर होणाऱया या वाहतुकीमुळे ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊन रात्री झोपणेही मुश्कील बनले आहे. अशी वाहतूक अडविणाऱया ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल झाले आहेत. उलट ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन वाळू माफिया व अवैध वाळू व्यवसायाला संरक्षण दिले जात आहे. शासन निर्णयानुसार कायदेशीर कारवाई करण्याची तुम्हा अधिकाऱयांची जबाबदारी आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळेच हा व्यवसाय राजरोस सुरू असून ग्रामस्थ व शासनाचे मोठे नुकसान होत आहे. त्याला प्रशासनाचे भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी कारणीभूत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

परप्रांतीय कामगारांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद नाही. त्यांच्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवत आहे, याकडे लक्ष वेधत 14 जानेवारी रोजी स्थानिक महसूल विभागाने तेथील रॅम्प उद्ध्वस्त केले. पण पुन्हा तेथे रॅम्प उभारून वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. त्यावर कायदेशीर कारवाई होत नसल्याने 26 रोजी उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनाही निवेदने सादर केली. सचिन परब, शामसुंदर परब, सुरेश परब, लक्ष्मण हळदणकर, रवींद्र करलकर यांच्यासह 70 ते 80 ग्रामस्थांच्या सहय़ा या निवेदनावर आहेत.

सोनवडेपार येथेही पुन्हा वाळू चोरी

सोनवडेपार येथील खाडीपात्रात मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. याबाबत तेथील आत्माराम धुरी व शिवाजी धुरी यांनी संबंधित विभागाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. नंतर महसूल विभागाने तेथील तब्बल 43 रॅम्प उद्ध्वस्त केले. पण या कारवाईनंतर पुन्हा वाळू माफियांनी तेथे रॅम्प तयार करून वाळू उपसा सुरू केला. शासकीय यंत्रणेलाही वाळू माफिया जुमानत नाहीत. एवढे मुजोर झाले आहेत, याला शासनाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांमधून होत आहे. हा बेकायदा वाळू उपसा न थांबल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Related posts: