|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » क्रीडा संस्कृतीच्या दिशेने…

क्रीडा संस्कृतीच्या दिशेने… 

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत आयोजिलेल्या ‘खेलो इंडिया’चे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पार पडणे, ही क्रीडा क्षेत्रासाठी समाधानकारक बाब म्हणायला हवी. या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत मारलेली बाजी हे नक्कीच आश्वासक आहे. पुणे नजीकच्या बालेवाडी येथे पार पडलेली ही स्पर्धा 17 व 21 वर्षांखालील गटात खेळवण्यात आली. कोणतीही मोठी स्पर्धा म्हटली, की आपल्याकडे त्यातील आयोजनाचा खर्च वा भ्रष्टाचारावरच प्रामुख्याने चर्चा झडतात.  मात्र, या वेळी खेळावरच चर्चा झाली, ही वेगळेपण ठरते.  महाराष्ट्रातील या स्पर्धेवर दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे खर्चाच्या बाबतीत थोडाफार हात आखडता घेतला गेला असला, तरी आयोजनाच्या बाबतीत कुठलीही कसूर ठेवली गेली नाही, हे मान्य करावे लागते. स्पर्धेसाठी मैदान तयार करण्यापासून ते शिवछत्रपती क्रीडानगरीला रंगरंगोटी करून सजविण्यापर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही सर्वच पातळीवर सकारात्मक दृष्टिकोण ठेवत मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांच्यासह केंद्रीय व राज्य क्रीडा खाते, खेलो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप प्रधान व क्रीडा क्षेत्रातील अन्य घटकांनाही याचे श्रेय द्यायला हवे. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड हे स्वतः आलिंपिक खेळलेले असल्यामुळे त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवांचा देशाला निश्चितच फायदा होऊ शकेल. या स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली या संघांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. हरियाणा, दिल्लीसारखे संघ भारतीय क्रीडा जगतात तगडे मानले जातात. मात्र, महाराष्ट्रातील खेळाडूंनीही तोडीस तोड कामगिरी करीत आपला दर्जा दाखवून दिला. यातील एएसआयच्या खेळाडूंची कामगिरी अधिक उजवी म्हणायला हवी. भविष्यातही सातत्य टिकविण्याचे आव्हान असेल. यातून राज्यासह देशालादेखील अनेक नवीन खेळाडू गवसले आहेत. त्यातही यंदाच्या पर्वात मुलींची कामगिरी विशेष म्हणता येईल. मुलींनी खेळाच्या सर्वच विभागात सरस कामगिरी बजावत ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले आहे. हे सुखद चित्र म्हटले पाहिजे. कर्नाटक, आसाम, केरळ, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब या भागातील खेळाडूंची कामगिरीही चमकदार अशीच आहे. खेलो इंडिया युथ गेम्सच्या माध्यमातून यंदा आपल्याला ईशा पवार, साक्षी शितोळे, आकाश गोरखा, चिन्मय सोमया, देविका घोरपडे, निखिल दुबे, तन्वीन तांबोळी, मिताली गुणेले, बिस्वामित्र चोंगथोम यांच्यासह अनेक रत्नांचा शोध लागला. प्रामुख्याने ग्रामीण भागातून अनेक खेळाडू पुढे आल्याचे दिसून आले. हे पाहता ग्रामीण भारतात मोठे टॅलेंट दडले असल्यावरच शिक्कामोर्तब होते. देशातील ईशान्य भाग हा दुर्लक्षित मानला जातो, तर जम्मू-काश्मीरचा बहुतांश भाग हा सतत दहशतवादाच्या सावटाखाली असतो. तेथील गुणवत्ता उठून दिसणे, हे बरेच काही सांगून जाते. या मुलांना अशाप्रकारचे व्यासपीठ मिळाले, तर या भागातील तरुणाई मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागणार नाही. पर्यायाने तेथील तरुणाई कुमार्गाला जाण्यापासून टळेल. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्येक शाळेत खेळाचा एक तास निश्चित करण्यात येणार असल्याचे घोषित केले. जावडेकर यांची ही घोषणा खेळ व खेळांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक ठरावी. किंबहुना, त्याची खरोखर अंमलबजावणी होणार का, हा मोठा प्रश्न आहे. वास्तविक, पूर्वीही शाळेमध्ये खेळाचा एक तास निश्चित केलेला असायचा. अनेक पिढय़ांनी हा तास अनुभवला असेल. खेळाच्या या तासाचा उपयोग बऱयाचदा गणित, इंग्रजी वा अन्य विषयांचे शिक्षक आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीच करीत अथवा अन्य कुठल्या तरी कारणासाठी खेळाच्या तासाचा वापर केला जाई. मात्र, खेळासाठी पीटीचा तास सत्कारणी लावल्याची उदाहरणे अपवादानेच सापडतील. दुसरे म्हणजे शाळेत नुसता खेळाचा तास निश्चित करून चालणार नाही. संबंधित शाळेत आवश्यक इतकेतरी क्रीडासाहित्य आहे काय, मैदान व इतर सोयी आहेत काय किंवा तशा त्या नसतील, तर त्या उपलब्ध कशा करता येतील, या दृष्टीने पावले उचलावी लागतील. अन्यथा, ‘ये रे माझ्या मागल्या,’ अशीच या घोषणेची स्थिती होईल. या गेम्सच्या माध्यमातून जावडेकर यांनी शाळेत खेळासाठी एक तास देण्याचे जाहीर केले खरे. मात्र, त्यांच्याच राज्यातील कारभार याबाबतीत चक्रावून टाकणारा आहे. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वीच राज्यातील शाळांमध्ये खेळाचे तास कमी करून क्रीडा शिक्षकांनादेखील कमी केले आहे, हा विरोधाभास म्हणावा लागेल. खेळाचा तास घ्यायचा झाला, तर तज्ञ क्रीडा शिक्षकांची गरज भासणारच. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला प्रथम आपल्या धोरणात सुधारणा करावी लागेल. तरच या साऱया गोष्टी प्रत्यक्षात येतील. 1994 मध्ये बालेवाडीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा थाटात पार पडल्या, त्यानंतर यूथ कॉमनवेल्थ स्पर्धा झाल्या, आता ‘खेलो इंडिया’चा जागर झाला. बालेवाडी क्रीडानगरीने त्या-त्या वेळी आपले महत्त्व अधोरेखित केले असून, खेळाला नेहमी हातभार लावला आहे. स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना मंच मिळतो. मात्र, केवळ तेवढय़ापुरते सीमित राहता कामा नये. खऱया अर्थाने देशात क्रीडा संस्कृती रुजवायची असेल, तर खेळासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आपल्याकडे असायला हव्यात. परदेशातील खेळाडूंप्रमाणे सुविधा मिळाल्या, तर नक्कीच चांगले क्रीडापटू पुढे येऊ शकतात. आपल्या देशात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना तितिकेसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्या विकासाला मर्यादा पडतात. शंभर, सव्वाशे कोटींच्या देशाला ऑलिंपिकमध्ये केवळ दोन, चार पदकांवर समाधान मानावे लागते, ही काही भूषणावह बाब ठरत नाही. मुळात खेळामध्येही करिअर होऊ शकते, ही मानसिकता आपल्याकडे तयार झाली पाहिजे. तसे झाले, तर क्रीडा क्षेत्रात नक्कीच आपण यशाचा झेंडा फडकवू शकतो.

Related posts: