|Monday, August 19, 2019
You are here: Home » leadingnews » इस्रोकडून जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोकडून जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 

ऑनलाईन टीम / श्रीहरीकोटा:

भारतीय अंतराळ संधोधन संस्थेने (इस्रो) इतिहास रचला आहे. काल रात्री उशिरा आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून इस्रोने जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. काल रात्री 11 वाजून 37 मिनिटांनी इस्रोनं मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅटचे प्रक्षेपण केले. मायक्रोसॅट उपग्रहामुळे लष्कराला मोठी मदत मिळणार आहे. तर कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. पीएसएलव्ही-सी44 च्या मदतीने या दोन्ही उपग्रहांचे  प्रक्षेपण करण्यात आले.

मायक्रोसॅट आणि कलामसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचे  अभिनंदन केले आहे. ‘पीएसएलव्हीच्या आणखी एका यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. या प्रक्षेपणामुळे भारताच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कलामसॅटने कक्षेत प्रवेश केला आहे,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी इस्रो आणि विद्यार्थ्यांचे  कौतुक केले. पंतप्रधानांसोबतच इस्रोच्या प्रमुखांनीही वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. इस्रो देशातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. तुमचे उपग्रह आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांचे  प्रक्षेपण करू, अशा शब्दांमध्ये इस्रो प्रमुख के. सिवन यांनी विज्ञानवाद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आवाहन केले. इस्रोने 2019 मधले पहिली मोहीम यशस्वी केली आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने  करण्यात आलेले  हे इस्रोचे  46वे  प्रक्षेपण आहे. इस्रोने प्रक्षेपित केलेला कलामसॅट उपग्रह अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे  वजन केवळ 1.26 किलोग्राम एवढे  आहे. विशेष म्हणजे अवघ्या सहा दिवसांमध्ये या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली. चेन्नईतल्या स्पेस किड्स इंडिया या स्टार्टअप कंपनीने कलामसॅटची निर्मिती केली आहे.