|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राज्यातील जनता परिवर्तनाच्या तयारीत

राज्यातील जनता परिवर्तनाच्या तयारीत 

शहर प्रतिनिधी/ फलटण

सध्या देशात व राज्यात कार्यरत असणाऱया फसव्या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील प्रत्येक मतदार संघात निर्धार परिवर्तनाचा म्हणून सभा आयोजित करीत आहे. या सभांना संपूर्ण राज्यातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता जनताही या सरकारला कंटाळली असल्याचे स्पष्ट होत असून  राज्यातील जनताही आता परिवर्तनाच्या तयारीत असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. 

आज मंगळवारी फलटण येथे परिवर्तन सभेचे आयोजन केले असून या सभेस उच्चांकी गर्दी करण्याचे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी निर्धार परिवर्तन सभा नियोजन आढावा बैठकीत केले.  यावेळी आमदार दीपक चव्हाण, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, नगराध्यक्षा निताताई मिलींद नेवसे, पंचायत समिती सभापती प्रतिभाताई धुमाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर, सदस्य विश्वजीतराजे
नाईक-निंबाळकर, सुभाष नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 मुधोजी क्लब मैदानावर सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात व राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेमध्ये जागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर सुरु असलेली निर्धार परिवर्तन यात्रा आज मंगळवारी फलटण येथे येत असून यावेळी मुधोजी क्लब मैदानावर सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार आहे. यानिमित्ताने माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे संजीवराजे यांनी स्पष्ट केले. 

  आज कोल्हापूरहून सातारा जिह्यात कराड येथे यात्रेचे आगमन होणार असून त्यादिवशी रहिमतपूर आणि फलटण येथे जाहीर सभा होणार आहेत. यात्रेचा मुक्काम फलटण येथे राहणार असून उद्या 30 रोजी यात्रा पंढरपूरकडे रवाना होणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिह्यात या परिवर्तन यात्रेनिमित्ताने राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे सर्व ठिकाणच्या नियोजन बैठकांतून स्पष्ट झाले आहे. 

आमदार दीपक चव्हाण म्हणाले, कार्यकर्त्यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक वाडय़ा वस्तीवर पोहचून या सभेस येण्याचे नागरिकांना आवाहन करावे. 

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला व खासदार शरद पवार यांच्या विचाराने पुढे जाणारा आपला सातारा जिल्हा आहे. अशा रॅली व सभांमधून पवार साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे होत असते. तरी या सभेला माण व खटाव तालुक्यातुन बहुसंख्य उपस्थिती दर्शविण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी दिले.

यावेळी विलासराव नलवडे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मिलींद नेवसे यांनी केले. आभार जयकुमार इंगळे यांनी मानले.