|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रात्रीत दोन मंदिरासह सहा ठिकाणी चोरी

रात्रीत दोन मंदिरासह सहा ठिकाणी चोरी 

प्रतिनिधी/ संकेश्वर

अज्ञात चोरटय़ांनी एकाच रात्री जैन मंदिर, दर्गाह व दूध डेअरी व तीन घरे फोडल्याची घटना सोलापूर (ता. हुक्केरी) येथे शुक्रवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घडली. यामध्ये चोरटय़ांनी रोख रकमेसह सोने-चांदीचा ऐवज लंपास केला. सदर घटना शनिवारी पहाटे गावकऱयांच्या लक्षात येताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे.

 सरकारी दूध डेअरी, कुंतीनाथ भगवान मंदिर, श्रीकांत पाटील, सुनील भूसण्णावर, संजीव कांबळे यांचे घर व जमालूद्दीन फकरुद्दीन बाबा दर्गा अशी चोरी झालेली ठिकाणे आहेत. टोळक्यांनी नियोजनबद्ध चोरी केल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.

सोलापूरला वीजपुरवठा करणाऱया ट्रान्स्फॉर्मरवर रात्री 2 च्या सुमारास बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी संपूर्ण गाव अंधारात गेल्याने याच संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी बंद घरे व दोन मंदिराला लक्ष्य केले. चोरटे टाळे तोडत असल्याचा आवाज काही शेजाऱयांना येत असतानाही अंधारामुळे कोणीही घराबाहेर पडण्याचे धाडस केले नाही. चोरटय़ांनी जैन मंदिरातील भगवान कुंतीनाथ मूर्तीवरील चांदीचे किरीट, बाजू बंद, मंगळसूत्र, चांदीचा नारळ, पाटील यांच्या घरातील तिजोरी फोडून अर्धा तोळे सोन्याची अंगठी व रोख चार हजार रुपये, सरकारी दूध डेअरीतील 1500 रुपये रोख व दर्गाहमधील पितळेच्या वस्तू एकत्रित करून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण सदर पितळेच्या वस्तू असल्याचे लक्षात येताच चोरटय़ांनी त्या तेथेच ठेवल्या.

श्वान व ठसे तज्ञ दाखल

मध्यरात्री एकाचवेळी 6 ठिकाणी चोरी झाल्यामुळे संपूर्ण गावात चर्चा रंगली आहे. चोर माहितीतीलच असावेत या अंदाजाने गावकऱयांनी या चोरीचा छडा लावावाच, अशी मागणी केल्याने पोलिसांनी तातडीने श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. श्वान पूजाने चोरी झालेल्या ठिकाणी धाव घेतली व ज्या मार्गाने चोरटय़ांनी पलायन केले त्या मार्गापर्यंत म्हणजे गावातून संकेश्वरकडे जाणाऱया रस्त्यावर येऊन घुटमळले. यावरून चोरटे संकेश्वर मार्गानेच पुढे गेल्याचे स्पष्ट होते. ठसे तज्ञांनी तिजोरी व देवस्थान गाभाऱयातील ठसे मिळविले आहेत.

घटनास्थळी गोकाक विभागाचे पोलीस उपायुक्त डी. टी. प्रभू, मंडल पोलीस निरीक्षक एस. व्हळेण्णावर, गुन्हा विभागाचे उपनिरीक्षक ए. पी. होसमनी व उपनिरीक्षक महमदरफिक तहसीलदार यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. तर चोरांना तातडीने जेरबंद करण्याची सूचना यावेळी प्रभू यांनी दिली.