|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भोसले कॉलेजमध्ये फार्मसी राष्ट्रीय परिषद

भोसले कॉलेजमध्ये फार्मसी राष्ट्रीय परिषद 

700 विद्यार्थ्यांचा सहभाग, 170 शोधप्रबंध व भित्तीपत्रके सादर

प्रतिनिधी / सावंतवाडी:

येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘नैसर्गिक रसायनशास्त्राचा अभ्यास व औषधनिर्माण शास्त्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे झाली. संपूर्ण देशभरातील नामांकित संशोधक व प्राध्यापकांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत 700 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. तसेच निरनिराळय़ा प्रकारचे 170 शोधप्रबंध आणि त्यावर आधारित भित्तीपत्रकेही सादर करण्यात आली.

परिषदेचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या भारत-जपान करार मंडळाचे सदस्य विनयकुमार आवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील सहस्त्रधारा-आयुषच्या संचालिका हेमा शर्मा, रत्नागिरी फार्मसी कॉलेजचे
प्राचार्य डॉ. किशोरकुमार बुराडे, गोवा फार्मसी कॉलेजचे डॉ. रघुवीर पिसुर्लेकर, संस्थेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत-भोसले, कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई व प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक उपस्थित होत्या.

संयुक्त औषध प्रणालीचा अवलंब!

उद्घाटनपर भाषणात विनयकुमार आवटे म्हणाले, 2014 साली स्थापन करण्यात आलेल्या आयुष मंत्रालयामुळे प्राचीन प्रचलित औषध प्रणालींचा नव्याने अभ्यास करण्यास चालना मिळाली. या औषध पद्धतींचे बहुतांशी ज्ञान हे संस्कृत, अरेबिक, तमिळ व जर्मन भाषांमध्ये उपलब्ध आहे. जग आज संयुक्त औषध प्रणालीकडे वळत आहे. जपानसारखा देश आयुर्वेदातील संशोधनात कितीतरी पुढे गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन संशोधन करताना प्राचीन उपलब्ध संदर्भांचाही वापर करावा. त्यासाठी आवश्यक त्या भाषाही शिकाव्यात. भारताच्या आयुष आणि जपानच्या एमई-बायो या पारंपरिक औषधप्रणालींवर सुरू असलेल्या संयुक्त संशोधन प्रकल्पाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत करत परिषदेच्या आयोजनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. परिषदेत सादर शोधप्रबंधांच्या डिजिटल स्मरणिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सकाळच्या सत्रात विषयतज्ञ डॉ. किशोरकुमार बुराडे यांनी वनौषधींसंबंधीची शास्त्राsक्त माहिती दिली. औषध निर्माण शास्त्रातील नैसर्गिक वनस्पतींचा वापर व त्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. डॉ. पिसुर्लेकर यांनी औषधांच्या रासायनिक संरचनेतील बदलांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर होणाऱया परिणामांची माहिती यावेळी दिली.

दुपारच्या सत्रात संशोधनपर भित्तीपत्रकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी विषयतज्ञ म्हणून डॉ. सी. आर. टेंपे, प्राचार्य, डी. फार्मसी कॉलेज, रत्नागिरी, डॉ. अन्सार पटेल, प्राचार्य, फार्मसी कॉलेज, महागाव, प्रा. संतोष कुरबेट्टी, प्राचार्य, फार्मसी कॉलेज, नेसरी, प्रा. मालवी, प्राचार्य, पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेज, डिगस, प्रा. अमोल खाडे उपस्थित होते. विषयतज्ञांनी केलेल्या मूल्यांकनानुसार गटनिहाय विजेते निश्चित करण्यात आले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी अच्युत सावंत भोसले यांनी राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल कॉलेजच्या समन्वय समितीचे अभिनंदन केले. पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याचा मानसही बोलून दाखवला.

सूत्रसंचालन प्रा. नमिता भोसले व बी. फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी दुर्गेश बिडये यांनी केले. आभार समन्वयक प्रा. विनोद मुळे यांनी मानले. परिषद यशस्वी होण्यासाठी प्रा. तुषार रुकारी, प्रा. सत्यजीत साठे, प्रा. दुर्गेश गौतम, प्रा. तन्मय पटवर्धन यांनी प्रयत्न केले.

Related posts: