|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डॉ. शिवाचार्य महाराजांच्या लोकसभा लढण्यावर ‘बंडाचे निशान’

डॉ. शिवाचार्य महाराजांच्या लोकसभा लढण्यावर ‘बंडाचे निशान’ 

 शिवाजी भोसले / सोलापूर

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीबरोबरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी पर्यायाने सत्ताधारी भाजपाने लक्ष केंद्रीत केलेल्या बहूचर्चीत सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपाची उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच, येथे या पक्षाच्या उमेदवारीवरून  बंडाचे निशान फडकावले जावू लागले आहे. लिंगायत समाजाच्या वोट बँकेचे हक्कदार समजून त्यांना भाजपाच्यावतीने निवडणूकीच्या आखाडय़ात उतरविण्याच्या हालचाली सुरु असलेल्या डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांच्या लोकसभा लढण्याला आक्षेप घेत, त्यांच्याविरोधात बंडाचे निशान फडकविण्यासाठी रान पेटवले जावू लागले आहे.

  विशेष म्हणजे लिंगायत धर्माला स्वतंत्र लिंगायत धर्म म्हणून  दर्जा देण्यास वीरशैव समर्थक डॉ. जय सिध्देश्वर महाराजांचा पाठिंबा नसल्यामुळे सोलापूर लोकसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून त्यांना लिंगायत समाजाचा पाठिंबा न देण्याचा ठराव औरंगाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय बैठकीत घेण्यात आल्याने डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांच्यारूपाने भाजपाच्या उमेदवारीचा चर्चेत आलेला चेहरा अडचणीत आला आहे. 

  तसेच लोकसभा निवडणूकीच्या आखाडय़ापूर्वीच, काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणाऱया डॉ.शिवाचार्य महाराज यांची उमेदवारी ‘क्लीन’ बोल्ड होण्याची शक्यता असल्याची चर्चा सोलापूर लोकसभा मतदार संघात सुरु झाली आहे. दरम्यान शिवाचार्य महाराज यांच्या चर्चेतील उमेदवारीमुळे काँग्रेसच्या पर्यायाने शिंदे  परिवार समर्थक गोटामधील अस्वस्थतेचे वातावरण निवळणार असल्याचीदेखील चर्चा सुरु झाली आहे.

  सोलापूर लोकसभा मतदार संघात लिंगायत समाजाचे लाखोंच्या संख्येने असणारे मतदार आणि या मतदारांमधून मिळणारी सहानभूतीची लाट तसेच राजकारण विरहीत पण निवडून येण्यासारखा उच्च शिक्षीत प्रेश चेहरा म्हणून गौडगाव मठाचे मठाधीश डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून आखाडय़ात उतरवण्याच्या हालचाली सुरु आहेत. दस्तुरखुद्द महाराजांनीसुध्दा निवडणूक लढवण्याला होकार दिला आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांची उमेदवारी चर्चेत आहे.

  तथापि महाराजांच्या उमेदवारीला खुद्द लिंगायत समाजाकडून विरोध होवू लागला आहे. महाराजांच्या राजकारणात येण्यालाच मुळी विरोध आहे. महाराजांनी गुरू म्हणून पर्यायाने मठाधिपती म्हणून आहे त्या उच्च ठिकाणी रहावे अशी लिंगायत समाजामधील लोकांची जनभावना आहे. निवडणूक लढवायची आणि जिंकायची म्हटले तर प्रसंगी मतदारांचे पायही धरावे लागतात. गुरू म्हणून लोक डॉ. शिवाचार्य महाराजांचे पाय धरतात त्याच महाराजांनी मतदारांचे पाय धरणे योग्य नाही असा सुर लिंगायत समाजामधील नागरिकांमध्ये आहे. त्याशिवाय राजकारण, निवडणूक  म्हटले की आरोप-प्रत्यरोपारांची चखलफेक होणारच. निष्कलंक, निःस्वार्थी राहिलेल्या महाराजांवर अशी चिखलफेक होवू शकते तसेच आजवर महाराजांकडे लिंगायत वा अन्य समाजाचे लोक दर्शनासाठी, आशीवार्दासाठी येतात. अशात महाराजांनी भाजपाकडून निवडणूक लढवल्यास महाराज एका विशिष्ट पक्षाचे, विचारधारेचे होणार म्हणून त्यांनी निवडणूकच लढवायला नको अशी जनभावना आहे. 

 ‘वीरशैव’ म्हणूनदेखील लिंगायतांचा महाराजांना विरोध

लिंगायत समाजामध्ये लिंगायत आणि वीरशैव असे दोन गट उघड उघड झाले आहेत. महात्मा बसवेश्वरांना मानणारा लिंगायत समाज लिंगायतला स्वतंत्र धर्माचा दर्जा कर्नाटकाप्रमाणे मिळावा म्हणून झगडतो आहे. लिंगायतांच्या या मागणीला वीरशैवांचा पाठिंबा नाही वीरशैवांचा हा गट बाजूला रहात आहे. डॉ.शिवाचार्य महाराज हे स्वतः वीरशैव असून ते वीरशैवांचे समर्थन करतात.म्हणून लिंगायत समाजाचे समर्थन निवडणूक लढवण्यासाठी महाराजांना नसल्याची चर्चा आहे.