|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिडकल जलाशयाच्या विद्युतपंपांची क्षमता वाढविणार

हिडकल जलाशयाच्या विद्युतपंपांची क्षमता वाढविणार 

@ प्रतिनिधी/ बेळगाव

हिडकल जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा करणाऱया विद्युतपंपांची क्षमता वाढविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना कंत्राटदाराला करण्यात आली आहे. यामुळे जानेवारी 2020 पासून शहराला आणखी नऊ एमजीडी जादाचे पाणी मिळणार आहे. त्याकरिता पाणीपुरवठा मंडळ 27 कोटीचा निधी खर्च करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंते व्ही. एल. चंद्रप्पा यांनी दिली.

  शहराची व्याप्ती वाढत चालली आहे. त्याचबरोबर शहरातील लोकसंख्यादेखील वाढत असल्याने इतर नागरी सुविधांसह पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सर्वच भागात सुरळीत पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा मंडळाला कसरत करावी लागत आहे. सध्या शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. राकसकोप जलाशयामधून रोज 12 एमजीडी पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे हिडकल जलाशयातून रोज नऊ एमजीडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हिडकल जलाशयामधून येणाऱया नऊ एमजीडीपैकी सहा एमजीडी पाणी विविध संस्थांना पुरवठा केले जाते. यामध्ये केएलई रुग्णालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, एअर फोर्स, हिंडाल्को, व्हीटीयू तसेच काही ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पाणीपुरवठा केला जातो. यामुळे 9 एमजीडीपैकी 3 एमजीडी पाणी शहराला मिळते. यामुळे हिडकलमधून होणाऱया पाणीपुरवठय़ाची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी 32 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणीपुरवठा मंडळाने निविदाही काढल्या होत्या. निविदा प्रक्रियेत फ्लोमोर लिमिटेड व बी. एस. पाटील हे कंत्राटदार पात्र ठरले आहेत.

  पाणीपुरवठय़ाची क्षमता वाढविण्यासाठी हिडकल, कुंदरगी आणि तुम्मरगुद्दी अशा 3 पंपिंग स्टेशनमधील विद्युतपंपांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. हे कंत्राट फ्लोमोर लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. हिडकल ते लक्ष्मीटेकडीपर्यंत काही ठिकाणची जलवाहिनी बदलण्याची गरज आहे. त्यामुळे एकूण तीन किलोमीटर अंतराची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. हे कंत्राट बी. एस. पाटील या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कामाची वर्कऑर्डर पाणीपुरवठा मंडळाने नुकतीच दिली असून विद्युपपंपाची क्षमता वाढविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची अट कंत्राटात घालण्यात आली आहे. यामुळे जानेवारी 2020 मध्ये हिडकल जलाशयामधून शहराला वाढीव पाणी मिळणार आहे. सध्या हिडकल जलाशयामधून 9 एमजीडी पाणी उपसा केले जाते. जानेवारीनंतर ही क्षमता दुप्पट होणार असून 18 एमजीडी पाणी उपसा केले जाणार आहे. यामुळे शहरातील पाणी समस्या निवारण्यास मदत होणार आहे.

 

Related posts: