|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पत्रकारांनी माणरत्नांचा केलेला गौरव कौतुकास्पद

पत्रकारांनी माणरत्नांचा केलेला गौरव कौतुकास्पद 

माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख,   दहिवडीत पत्रकारांच्यावतीने माणरत्नांचा गौरव सोहळा उत्साहात

प्रतिनिधी/ दहिवडी

माणच्या संस्कारांमुळे आज माणदेशी लोक विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसून येत आहेत. त्यांच्या कार्याची दखल आजपर्यंत अनेकांनी घेतलीही असेल पण आपल्या मातीतला पुरस्कार पाठीवर कौतुकाची थाप टाकणारा असतो. तेच काम माण पत्रकार संघाने केले असून माणरत्नांचा गौरव कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले. 

 दहिवडी (ता. माण) येथे सिध्दनाथ मंगल कार्यालयात माण तालुका पत्रकार संघाच्यावतीने माणरत्नांचा माणगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, जिल्हा परिषद सदस्य अरूण गोरे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली पोळ, नगराध्यक्षा साधना गुंडगे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, वाघोजीराव पोळ, भाजपाचे विश्वंभर बाबर, पी. डी. सोनवणे, प्राथमिक शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र अवघडे, युवराज सुर्यवंशी, डॉ. संदीप पोळ, बाळासो सावंत, तानाजी मगर, सुनिल पोरे, गटविकास अधिकारी जी. डी. शेलार, गणेश बोबडे, डॉ. प्रदीप पोळ, सचिन होनमाने, अजित केवटे, समीर तांबोळी, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे, संघाचे अध्यक्ष बापूसाहेब मिसाळ, सर्व पत्रकार, मान्यवर व नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱया सर्व माणरत्नांना सन्मानित करण्यात आले.

प्रभाकर देशमुख म्हणाले, पुरस्कारप्राप्त सर्वजण आदर्श व्यक्ती आहेत. माणदेशातील सुरेखा माने या कन्येने प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वातून माणचे नाव उज्वल केले आहे. अजित पवार याने जलसंधारणात क्रांती करत लोकसहभाग उभा करून मोठे काम उभे केले आहे. संदीप घोरपडे यांनी हायवे रस्त्यावर स्वखर्चातून रूग्णवाहिका देण्याचा घेतलेला निर्णय माणुसकीचा आहे. विरभद्र कावडे सरांनी क्रिडा स्पर्धेत मुले घडवण्याचे काम केले आहे. वाघोजीराव पोळ, वैभव पोरे, अभिजीत सोनवणे, सागर घोरपडे, महेश सोनवले, अजित दडस, सौ. बाबर, अमोल काटकर व पत्रकारांनी आपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्याच कार्याची दखल माणच्या पत्रकार संघाने घेतली आहे.

पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा

या भागासाठी पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. पाणी उपलब्ध करून देणे, पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून शेती करणे, या भागात एक अत्याधुनिक हॉस्पीटल बरोबरच रोजगार उपलब्ध करण्यावरही येणाऱया काळात लक्ष देण्याची गरज  असल्याचेही त्यांनी सांगितले.

 आमदार जयकुमार गोरे म्हणाले, माणदेशी माणसांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर विविध क्षेत्रात चांगले काम केले आहे. आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण करत गावाचे, तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्या कर्तृत्वान लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत अजून चांगले काम करण्यासाठी प्रवृत्त करत माण पत्रकार संघाने केलेला गौरव स्तुत्य आहे. अनिल देसाई, मामूशेठ विरकर, विश्वंभर बाबर, संजय भोसले तसेच पुरस्कार प्राप्त माणरत्नांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन लालासाहेब दडस, रूपेश कदम, आनंद बडवे यांनी केले तर आभार विठ्ठल काटकर यांनी मानले.

 

Related posts: