|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » विविधा » गणेशजन्मानिमित्त ’दगडूशेठ’ ला स्वराभिषेक, मिरवणूक आणि गणेश जागर

गणेशजन्मानिमित्त ’दगडूशेठ’ ला स्वराभिषेक, मिरवणूक आणि गणेश जागर 

ऑनलाईन टीम / पुणे :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच शुक्रवार, दिनांक 8 फेब्रुवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार असून नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी 6 वाजता मंदिरापासून निघणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. 

शुक्रवारी पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत सुप्रसिद्ध गायिका मधुरा दातार या श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण करणार आहेत. शास्त्रीय गायनासह भक्तीगीते ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. त्यानंतर सकाळी 8 ते 11 यावेळेत गणेश भक्तांच्या हस्ते गणेश याग होईल. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. सायंकाळी 6 वाजता श्रीं ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बँड आदी सहभागी होतील.

दगडूशेठ गणपती मंदिरापासून – लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर – रामेश्वर चौक – टिळक पुतळा मंडई – कोतवाल चावडी – बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक – नू.म.वि. प्रशाला – अप्पा बळवंत चौक – तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप होईल. रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने श्री गणेशजन्म सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.