|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » आरबीआयकडून सरकारला मिळणार 28 हजार कोटींचा लाभांश

आरबीआयकडून सरकारला मिळणार 28 हजार कोटींचा लाभांश 

वृत्तसंस्था/ मुंबई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आपल्याकडील असलेल्या अतिरिक्त रकमेतून सरकारला तात्काळ वाटा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, केंद्रीय बँक ऑडिट कमिटीने चालू आर्थिक वर्षाच्या आधारावर केंद्र सरकारला 28 हजार कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा 18 फेब्रुवारीला होणाऱया संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार आरबीआयकडे वर्षाला अतिरिक्त जमा होणाऱया रकमेच्या हिस्साची मागणी करत आहे. मात्र, बँकेने राखीव (सरप्लस) रकमेमधून हिस्सा देण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेकडे असलेला राखीव निधी हा गरजेपेक्षा अधिक असल्याचा दावा केंद्राने केला आहे. दरम्यान, बँकेकडे किती राखीव रक्कम आहे याचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. येणाऱया 31 मार्चपर्यंत या समितीचा अहवाल अपेक्षित आहे.

केंद्र सरकारने मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात आर्थिक सल्लागार सुभाषचंद्र गर्ग यांनी रिझर्व्ह बँकेकडून 28 हजार कोटींचा लाभांश मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ही रक्कम गेल्या वर्षी देण्यात आलेल्या 40 हजार कोटी रुपयांव्यतिरिक्त आहे, असे सांगितले आहे. दरम्यान, बिमल जालान यांच्या समितीने शिफारस करण्याआधीच सरकारला 40 हजार कोटी रुपये देणे योग्य ठरणारे नाही, असे बँकेने नमूद केले आहे.