|Monday, August 26, 2019
You are here: Home » leadingnews » दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग, 17 जणांचा मृत्यू

दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग, 17 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

 दिल्लीतील करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी (12 फेब्रुवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ही भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत अनेक जणांचा मृत्यू हा गुदमरून झाला आहे. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. तर भाजलेल्या व्यक्तींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्पित पॅलेस या हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी आग लागली तेव्हा अनेक जण गाढ झोपेत होते.  या आगीतून 25 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.  तातडीने हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या जेणेकरुन धूर बाहेर जाईल. दिल्लीताल हे हॉटेल पाचमजली असून अनेकांनी आपला जीव वाचावा यासाठी  इमारतीवरुन उडया मारल्या आहेत.