|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कुणी न्याय देता का न्याय…?

कुणी न्याय देता का न्याय…? 

विशेष प्रतिनिधी /बेळगाव :

निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील रहिवासी सदाशिव विठोबा आंबी (वय 74) हे वृद्ध आपले हक्काचे घर मिळावे यासाठी ठिकठिकाणी न्याय मागत आहेत. ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून न्याय मिळत नसल्याने आपण दाद मागायची कोणाकडे? असा सवाल त्यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी, सदाशिव आंबी यांनी सन 1982 साली कृष्णा आप्पा वडर यांच्याकडून महादेव गल्लीमध्ये 16ƒ35 आकाराची जागा रितसर खरेदी करून घेतली होती. आंबी कित्येक वर्षे त्या घरात वास्तव्यास होते. घर नंबर 865/1 या घराच्या दुरुस्तीसाठी व शौचालय बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज करून परवानगी मागितली होती. ग्रा. पं. ने या कामासाठी परवानगी दिली आहे. याशिवाय माझ्या नावावर घर असल्याचा संगणक उतारा माझ्याकडे आहे. 1982 पासून आजअखेर मी घरफाळाही ग्रा. पं. भरला आहे. असे असताना मूळ घरमालकाच्या नातेवाईकांनी माझ्यावर अन्याय केला आहे. गेल्या डिसेंबर 2018 मध्ये घरासमोरील आंब्याचे झाड तोडले व राहते घरही दादागिरीने पाडले असून घरातील साहित्यही लंपास केले आहे. याची तक्रार मी निपाणी पोलीस स्थानकात दिली होती. पण माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. म्हणून आपण बेळगाव येथे जाऊन तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांच्यासमोर माझ्यावर झालेल्या अन्यायाचे गाऱहाणे मांडले. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही भेटलो. त्यांनी आपल्याला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

 या सर्व प्रकरणामुळे माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे. स्वतःचे घर असताना, संगणक उतारा असताना व आजअखेर घरफाळा ग्रा. पं. भरला असतानाही न्याय मिळत नाही. यामुळे मी निराश झालो आहे. या प्रकरणाची वरिष्ठांमार्फत सखोल चौकशी होऊन माझे घर मला परत मिळावे अन्यथा ग्रा. पं. समोर कुटुंबासमवेत आत्मदहन करण्याचा इशारा सदाशिव आंबी यांनी दिला आहे.