|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘हर हर महादेव’ च्या गजरात शंकराचार्य रथोत्सवाची सांगता

‘हर हर महादेव’ च्या गजरात शंकराचार्य रथोत्सवाची सांगता 

विविध स्वामीजींच्या हस्ते कळसारोहण : रथावर खारीक, खोबऱयाची उधळण

प्रतिनिधी / संकेश्वर

बेळगाव जिल्हय़ात एकमेव असा येथील करवीर श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य संस्थान मठात शुक्रवारी सकाळी 9 वाजता श्री शारदांबा मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्याने कळसारोहण समारंभ सत्पुरुषांच्या उपस्थितीत पार पडला. दुपारी रथोत्सवाच्या सांगता मिरवणुकीला सुरुवात झाली. या दोन्ही कार्यक्रमाला हजारेंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी तब्बल पाच तासानंतर रथ शंकराचार्य मठाच्या नियोजित जागेवर पोहोचला.

मठातील प्राचीन श्री शारदांबा मंदिरावर मत्तुरु शिवमोगा मठाचे मठाधिपती बोधानन्देंद्र सरस्वती महास्वामीजी, निडसोशी मठाचे श्री शिवलिंगेश्वर स्वामीजी, कंपली होसपेठ मठाचे श्री नारायण विद्याभारती स्वामीजी, क्षेत्र गांगणापूर मठाचे श्री वल्लभानंद सरस्वती स्वामीजी, शिरसी मठाचे श्री रघुनंदन सरस्वती स्वामीजी, योगाश्रम पुण्याचे श्री योगेशचंद्र जोशी महाराज, वाशीमचे श्री विजय काका पोकळी महाराज व संकेश्वर शंकराचार्य मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजी. यांच्या अमृतहस्ते कळसारोहण करण्यात आले.

शंकराचार्य मठाचा विकास आनंद देणारा

हा मठ प्राचीन कालीन असून या मठाची ख्याती कर्नाटक, महाराष्ट्र, कोकण व गोव्यापर्यंत आहे. या मठाचा विकास यापूर्वीच व्हायला हवा होता. पण हा विकास करण्याचे भाग्य जगद्गुरू श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजींना लाभले आहे. गेल्या दोन वर्षात दत्त मंदिर, पंचलिगेश्वर मंदिर, अन्नपुर्णेश्वरी मंदिर व आता शारदांबा मंदिराच्या जीर्णोद्धाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे मंदिराच्या सौंदर्यात व सुशोभिकरणात अधिकची भर पडली आहे. असे मत उपस्थित सर्व स्वामीजींनी व्यक्त केले.

दुपारी 3 वाजता जगद्गुरू शंकराचार्य संस्थान मठाचे मठाधिपती श्नी सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजींच्या पूजेनंतर रथ हलविण्यात आला. यानंतर शंकराचार्य मठाचे हक्कदार, मानकऱयांच्या सहभागाने रथोत्सवाच्या सांगता मिरवणुकीला सुरुवात झाली. परंपरेनुसार भाविक रथावर श्रीफळ फोडण्यासह खारीक, खोबऱयांची उधळण करीत होते.  सोमवारपासून सुरू झालेल्या रथोत्सवाला कर्नाटकासह महाराष्ट्र, कोकण भागातील भाविकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला. सुमारे पाचशेहून अधिक वर्षांची परंपरा या रथोत्सवाला आहे. तर दक्षिणकाशी म्हणून श्री शंकराचार्य संस्थानमठ (करवीर) अशी या मठाची ख्याती आहे.

रथोत्सवात हिराशुगरचे चेअरमन आप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरे, पृथ्वी कत्ती, डी. एन. कुलकर्णी, संजय शिरकोळी, संजय नष्टी, पवन पाटील, उमेश कांबळे, दीपक भिसे, कृष्णकांत मुळे, दामोदर खटावकर, पुष्पराज माने, जयप्रकाश सावंत, बसवराज बागलकोटी, आप्पासाहेब मर्डी, अभिजीत कुरणकर, राजू बोरगांवी, आप्पा शिंत्रे, आप्पाजी चौगुले, नागेश क्वळ्ळी, राजेश गायकवाड, विकी क्वळ्ळी, आप्पा पाटील, सुहास कुलकर्णी, राजू शिंदे, नेताजी आगम, आप्पासाहेब हेद्दूरशेट्टी, पालिका मुख्याधिकारी जगदीश इटी, अभियंता आर. बी. गडाद, राजू बांबरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

स्टॉलची गर्दी

यात्रेनिमित्त मठाच्या परिसरात आधुनिक झोपाळे, वेगवेगळे मनोरंजक स्टॉलसह मिठाई, खेळणी, स्टेशनरी स्टॉलनी गर्दी केली आहे. यात्रेचा आनंद लुटण्यासाठी बालचमूसह मध्यमवर्गीय व वृद्ध देखील झोपाळय़ात झोका घेताना दिसत होते. यात्रा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.