|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप 

ऑनलाईन टीम / बुलडाणा :

जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील वीरपूत्रांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. बुलडाणामधील मलकापूर येथे शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. वंदे मातरमच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. जमलेल्या समुदयामध्ये संतापाची भावना दिसून येत होती. शहीद संजय राजपूत यांच्या अंत्यदर्शनासाठी  जिल्ह्यातून तरुणांची गर्दी मलकापूर येथे पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक गर्दी जवळपास एक ते सव्वा लाखांच्या आसपास अंत्यदर्शनासाठी गर्दी जमली आहे. तसेच पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले गेले. त्यांच्यावर लोणारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. याठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे.

   बुलडाणा जिह्यातले चोरपांगरा गावातले नितीन राठोड यांना साश्रू नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. नितीन राठोड यांच्या मूळगावी चोरपांगरा इथे त्यांचे पार्थिव शासकीय इतमामात आणण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या भावनांचा बांध फुटला. असंख्य लोक रस्त्यात रडताना दिसले. हुतात्मा राठोड अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ज्या गावात हुतात्मा राठोड लहानाचे मोठे झाले. त्या गावात त्यांना मानवंदना देण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी गर्दी केली. पंचक्रोशीतून या गावाकडे पहाटेपासूनच ग्रामस्थांची रिघ लागली होती.