|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » पुन्हा तेजीचा अनुभव, निर्देशांक विक्रमानजीक

पुन्हा तेजीचा अनुभव, निर्देशांक विक्रमानजीक 

वृत्तसंस्था /मुंबई:

अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि जागतिक शेअरबाजारांमधील सकारात्मक वातावरण यांचा अनुकूल परिणाम होऊन भारतातील शेअरबाजारांची स्थितीही बळकट झाली आहे. नव्या सप्ताहाच्या प्रारंभी पुन्हा तेजीचा सुखद अनुभव येत असून त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये समाधानाची भावना आहे. दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 341.90 अंकांची घसघशीत वाढ होऊन तो 36,213.38 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 88.45 अंकांच्या वाढीसह दिवसअखेर 10,880.10 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही चांगला वधार दिसून आला आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाची तीव्रता कमी झाल्याने, तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भारताकडे आकर्षित होऊ लागल्याने शेअरबाजारांमधील गुंतवणूक वाढू लागली आहे. या वाढीला आता सकारात्मक देशांतर्गत वातावरणाची जोड मिळाल्याने शेअरबाजार विक्रमाच्या नजीक पोहचले आहेत, अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली आहे.

सोमवारच्या व्यवहारांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग कंपन्यांच्या जोरदार कामगिरीमुळे निर्देशांकांना बळकटी प्राप्त झाली. येस बँकेचे समभाग सर्वाधिक प्रमाणात म्हणजे 3.24 टक्क्यांनी वधारले. त्याखालोखाल टीसीएसच्या समभागांमध्ये 3.07 अंकांची वृद्धी झाली. इन्फोसिस, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, सन फार्मा, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक आणि वेदांता या कंपन्यांच्या समभागांचीही जोरदार खरेदी झाली. याशिवाय, हीरो मोटर, आयटीसी, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी, एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलीव्हर आणि मारूती सुझुकी या कंपन्यांनाही लाभ झाला. वेदेशी गुंतवणूकदारांनी 6 हजार 311 कोटींच्या समभागांची खरेदी केली. युरोपियन व आशियायी शेअरबाजारांच्या बव्हंशी सर्व निर्देशांकांमध्ये वाढ झाली.