|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मयूरध्वज आत्मयज्ञास तयार

मयूरध्वज आत्मयज्ञास तयार 

तो ब्राह्मण राजा मयूरध्वजाला आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल सांगतो आहे. तो सिंह पुढे काय म्हणाला पहा-हे ब्राह्मणा! मला आताच भूक लागली आहे. तुझ्या मुलाला त्याच्या वंशवृद्धीकरता प्रजोत्पत्ती करू देण्यापर्यंत थांबलो तर मी क्षुधेने मरूनही जाईन. तथापि, यातही एक तोड आहे. मयूरध्वज राजा अगदी तुझ्या मुलासारखा धष्टपुष्ट आहे. त्याचे अर्धे शरीर जर तू मला आणून दिलेस तर मी तुझ्या पुत्राला जिवंत सोडीन. तरी हे मयूरध्वजा! तू पूर्वीच्या राजांप्रमाणे आत्मयज्ञ करून महापुण्य मिळव!

कुणी एका संत कवीने याप्रसंगी मयूरध्वज राजाने मनोमन काय विचार केला याचे सुंदर वर्णन केले आहे ते असे-

अशी ऐकतां दीन ते विप्रवाणी । नृपाच्या बहू लोचनीं येत पाणी ।

म्हणे हो तरी हे तनू विप्रकाजीं ।समर्पून होईन मी धन्य आजी ।

धन सुत पशु जाया सर्वही व्यर्थ माया । क्षणिक मनुज ।     

  काया निश्चयें जाय वायां ।

तरि चुकत अपाया त्याच कीजे उपाया । म्हणउनि मनिं राया सौख्यसें देह द्याया ।…

ब्राह्मणाचे हे वचन ऐकून राजा म्हणाला-जरूर! यायोगे माझा हा देह योग्य कामी पडेल असेच मला वाटते. मग मयूरध्वजाने आपल्या पुत्रास सिंहासनावर बसवून स्वतः गंगाजळाने स्नान केले व शाळिग्राम आणि तुळसीपत्र जवळ ठेवून तो प्रसन्न चित्ताने आपल्या प्रजाजनांस म्हणाला,

-या ब्राह्मणाला आपल्यापैकी कोणीही दोष देता कामा नये. मी हे माझे शरीर अत्यानंदाने त्याच्या हितार्थ देत आहे. हे शरीर म्हणजे खरे तर कृमिकीटकांचे आगर आहे पण त्याचाही सदुपयोग करावा. त्याचे हे म्हणणे काही लोकांना अर्थातच अमान्य होते व तसे त्यांनी बोलूनही दाखवले. पण अतिथी हा परमेश्वराचेच रूप असल्याने त्याची इच्छापूर्ती करणे हा माझा गृहस्थ धर्म आहे तर ब्राह्मण याचकाची इच्छा पूर्ण करणे हे माझे राजा म्हणून कर्तव्य आहे, असे सांगून राजाने त्यांना समजावले व आपल्या हातांनी एक करवत आपल्या शिरावर ठेवली.

त्यावेळी त्याची राणी शुद्धमती ही पुढे होऊन आपल्या पतीला म्हणाली – पत्नी म्हणजे पतीचे अर्धांग असते. ब्राह्मणाला अर्धांगच हवे आहे. तेव्हा तुम्ही तुमचे शरीर कापून त्याचा अर्धा निर्जीव मांसाचा भाग त्या सिंहाला देण्यापेक्षा, मला सजीवच सिंहाला द्या. म्हणजे त्याचीही क्षुधा शमेल व मलाही या जगी वैधव्यपंकात पडण्याचे पाप भोगावे न लागता पतिव्रता धर्म सांभाळण्याचे पुण्य मला लागेल.

हे ऐकून तो ब्राह्मण घाबरून म्हणाला-राजा! स्त्रीरूपी डावे अंग सिंहाला नको आहे. तुझे उजवे अंगच मला दे. त्यानेच माझा पुत्र त्याच्यापासून सुटेल. बरे, जर तू त्याला तुझी स्त्री दिलीस तर तू स्वतः भ्यालास असेच लोक म्हणतील व तुझ्या अपकीर्तीस तूच कारण बनशील. अपकीर्तीचे जीणे हे पराक्रमी पुरुषास किती लाजिरवाणे होते हे तुला सांगायला हवे काय?

ऍड. देवदत्त परुळेकर