|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुडचडेतील दुकानदारांकडून वर्षाला सहासे रूपये कचरा शुल्क आकारणार

कुडचडेतील दुकानदारांकडून वर्षाला सहासे रूपये कचरा शुल्क आकारणार 

प्रतिनिधी/ कुडचडे

कुडचडे-काकोडा नगरपालिका क्षेत्रातील सर्व सामान्य दुकानदारांकडून वर्षाकाठी 600 रूपये कचरा शुल्क आकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याच बरोबर छोटी-मोठी हॉटेलस्, रूग्णालये, हॉस्पिटल, नर्सिंग होमस्, शोरूम सेलिंग व इतर काही श्रेणीसाठी वेगळी शुल्क आकारली जाणार असून त्या संदर्भातील निर्णय माघावून घेतला जाणार आहे.

कालच्या बैठकीला कुडचडे बाजारातील 200 हून अधिक दुकानदार तसेच वीजमंत्री नीलेश काब्राल,  कुडचडे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष रोशा परेरा,  नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पालिका अभियंता व मुख्याधिकारी उपस्थित होते. या पूर्वी दि. 6 मार्च रोजी कुडचडे बाजाराच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मुख्याधिकारी व उपनगराध्यक्षा व्यतिरीक्त अन्य कोणीच उपस्थित न राहिल्यामुळे व बैठकीत व्यवस्थित चर्चा न झाल्याने, काल बैठक बोलावून त्यात चर्चा करण्यात आली.

पालिकेने दि. 2 मार्च रोजीच्या मराठी व इंग्रजी दैनिकांमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करून प्रत्येक दिवशी आकारण्यात येणाऱया कचरा शुल्काची माहिती देण्यात आली होती. हाच मुद्दा कुडचडे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष रोशा परेरा यांनी बैठकीत मांडला. यावेळी असोसिएशनचे सचिव रवींद्र लाड तसेच इतर सदस्य व कुडचडे बाजारातील अंदाजे 200 हून जास्त दुकानदार उपस्थित होते. यासाठी सर्व दुकानदारांनी दुपारी 1 वाजता बंद करणारी दुकाने 11.30 वाजता बंद करून बैठकीसाठी हजेरी लावली होती.

यात परेरा याने विषय मांडताना सांगितले की, सदर जाहिरात प्रकाशित करण्यापूर्वीकुडचडे मंर्चट असोसिएशनला विश्वासात का घेतले नाही असा प्रश्न परेरा यांनी मुख्याधिकाऱया सोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले नगराध्यक्ष, नगरसेवकांना विचारला. तसेच सदर सुचीत प्रती दिवशी गोळा करण्यात येणाऱया कचऱयासाठी लावलेला शुल्क अत्यंत जास्त असून तो कोणत्याच दुकानदारांना मंजूर नसून त्यासाठी पालिकेने सर्व दुकानदारांना समान शुल्क आकारावा अशी मागणी केली.

चर्चेत आपले विचार मांडताना व्यापारी पांडुरंग देसाई यांनी सांगितले की, कचरा शुल्क लावणे आवश्यक आहे. पण, पालिकेने ज्याप्रमाणे बाजाराकरांना विश्वासात न घेता शुल्का आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो चुकीचा असून त्यावर परत एकदा सर्वेक्षण करून निणर्य घ्यावा.

दवाखान्यातील कचरा हा सामान्य कचरा नसून त्यासाठी सदर कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी आपण सरकारला शुल्क भरतो आहे व आपल्या इस्पितळाचा बायो मॅडीकल कचरा आपण बांबोळीला पाठवतो. कारण सदर कचऱयाची विल्लेवाट लावण्याची सोय येथे नाही. जर सदर व्यवस्था होत असेल तर आपण ती पालिकेकडे सुपूर्द करू, पण त्यासाठी लावलेला दर ही अत्यंत जास्त आहे यावर डॉ. शेल्डेकर यांनी यावेळी लक्ष वेधले.

आज खाण व्यवसायावर बंदी घातल्यामुळे कुडचडे बाजाराची आर्थिक स्थिती कोणत्या पातळीवर आली आहे ते सर्वांना माहित आहे. तरी पालिकेने कचरा गोळा करण्यासाठी लावलेले शुल्क हे भरमसाठ असून बाजाराची स्थिती बघून सदर शुल्क कमी करावा अशी मागणी व्यापारी रुदेश तेंडूलकर यांनी केली.

यावेळी काही दुकानदारांनी सदर मुद्यावर बोलताना कचऱया प्रकल्पासंबधीत आमदारांनी दिलेल्या आश्वासनावर लक्ष वेधले व सांगितले की, सदर कचरा प्रकल्प अत्यंत आवश्यक असून सुद्धा सदरचे काम अजून सुरू करण्यात आले नाही. त्यात पालिकाद्वारे कचरा गोळा करण्यावर लावलेला शुल्क हा पुढे मोठी डोकेदुखी होणार असून सदर शुल्क कमी करावे अशी मागणी अनेकांनी यावेळी केली.

कचरा शुल्कावर कुडचडे मर्चंट असोसिएशनचे सदस्य व उपस्थित दुकानदार यांच्याबरोबर स्थानिक आमदार तथा वीजमंत्री नीलेश काब्राल यांची सूमारे अडीच तास चर्चा केली. या बाचाबाचीत पालिका बरखास्त करण्यापर्यंत मुद्दा आला. पण मर्चंट असोसिएशने मध्यस्थी घेत शेवटी आकारण्यात येणारा कचरा शुल्क सामान्य श्रेणीत येणाऱया सर्व दुकानदारांसाठी 600 रूपये प्रती वर्ष आकारण्यात यावा अशी मागणी पालिकेकडे केली आहे व त्यासाठी सर्व दुकानदारांनीही त्यावर होकार दर्शविला आहे.

त्यावर पालिकेतर्फे मान्यता देताना आमदार श्री. काब्राल यांनी सांगितले की, सदर 600 रूपये आकारण्यात येणार शुल्क हा फक्त सामान्य दुकानासाठी असून त्यामध्ये छोटी-मोठी हॉटेलस्, रूग्णालय, हॉस्पिटलस्, नर्सिंग होम, शोरूम सेलिंग व इतर काही श्रेणी येणार नाहीत. त्यासाठी सदर आस्थापनाच्या मालकांनी आपल्या सुचना पालिकेला कळवाव्या त्यानूसार पालिका त्यांना विश्वासात घेऊनच त्यावर निणर्य घेणार आहे. तसेच चर्चेत आलेल्या पार्किंग जागेवर बाजाराच्या दिवशी बसणाऱया फेरीवाल्यांच्या विषयावर ताबडतोब तोडगा काढण्यात येईल असे काब्राल यांनी व्यापाऱयांना आश्वासन दिले.