|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्राध्यापकांचे खाजगी क्लास थांबवा अन्यथा आंदोलन

प्राध्यापकांचे खाजगी क्लास थांबवा अन्यथा आंदोलन 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

कोल्हापूर शहरामध्ये बेकायदेशीर रित्या काही प्राध्यापक खाजगी शिकवणी घेत आहेत. शाश्वत पगाराची सरकारी नोकरी असताना काही प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक गुणांचे आमिष दाखवून, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती करीत आहेत. संबीधीत प्राध्यापकांवर कारवाई न केल्यास कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट टिचर्स असोसिएशन (केप्टा) तीव्र आंदोलन करेल असा इशारा मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना निवेदनाव्दारे दिला.

निवेदनात म्हंटले आहे, निसर्गाचा नियम आहे जगा आणि जगू द्या स्वत:ला पोटभर मिळत असताना, दुसऱयाच्या तोंडचा घास काढून घेण्याचा हा प्रकार आहे. उच्चशिक्षित, बेरोजगार तरूण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी क्लास व व्यवसायाकडे वळतात. कोणतेही स्थावर भांडवल नसताना केवळ बुध्दीच्या जीवावर स्वकौशल्यावर ते जीवनात स्वत:ला व विद्यार्थ्यांना उभे करू पाहात आहेत. यातून एखाद्या प्रामाणिक, गरजू, बेरोजगार तरूणाला नोकरी मिळू शकते. काही प्राध्यापक कॉलेजच्या व्यासपीठाआडून बेकायदेशीर कृत्य करतात, हे थांबले पाहिजे. अन्यथा केप्टा तीव्र आंदोलन करेल असा इशारा केप्टातर्फे देण्यात आला. यावेळी प्रा. सुभाष देसाई, अतुल निंगोरे, रंगराव जाधव, संजय यादव, संजय काळे, संगीता स्वामी , भारती आरगे, मधुरा देसाई, उदय शिपेकर आदी उपस्थित होते.

Related posts: