|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तिलारी धबधब्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

तिलारी धबधब्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

प्रतिनिधी /बेळगाव :

अकरावीची परीक्षा संपवून तिलारी येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या सुळगा (हिं.) येथील एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून सायंकाळी अग्निशमक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न मृतदेह पाण्याबाहेर काढला.

विनय संजय कांबळे (वय 17 रा. सुळगा-हिंडलगा), असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजता चौघेजण धबधबा पाहण्यासाठी गेले होते. दुपारी विनयचा धरणाखालील धबधब्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. विनयसोबत गेलेल्या त्याच्या मित्राने ही गोष्ट त्याच्या कुटुंबीयांना कळवली. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 4 नंतर मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अग्निशमक दलाच्या जवानांना पाचारण केले. अग्निशमक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांच्या नेतृत्त्वाखालील एका पथकाने मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू केले. त्यानंतर थोडय़ावेळात विनयचे कुटुंबीय व नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले.

सायंकाळी 6.45 च्या सुमारास विनयचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विनय हा लिंगराज कॉलेजचा विद्यार्थी होता. अकरावीची परीक्षा झाल्यानंतर आपल्या मित्र मैत्रिनिंसमवेत धरण पाहण्यासाठी गेले असता ही घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.