|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ग्रामविकास खात्याच्या अभियंत्याकडून 2 कोटी रुपये जप्त

ग्रामविकास खात्याच्या अभियंत्याकडून 2 कोटी रुपये जप्त 

प्राप्तिकर अधिकाऱयांची कारवाई : हावेरीतील छाप्यात 25 लाख रु. जप्त

प्रतिनिधी/ बेंगळूर

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच सर्वपक्षांनी प्रचारावर भर दिला आहे. तर दुसरीकडे निवडणूक काळात बेकायदेशीरपणे होणाऱया पैशांच्या व्यवहारावर प्राप्तिकर खात्याने करडी नजर ठेवली आहे. शुक्रवारी सकाळी बेंगळूरमधील ग्रामविकास खात्यातील कार्यकारी अभियंत्याने निवडणुकीसाठी कंत्राटदाराकडून जमा केलेले 2 कोटी रुपये जप्त प्राप्तिकर विभागाने केले आहेत. या प्रकरणात मंत्री कृष्णभैरेगौडा यांच्यावर आरोप होत आहे.

हावेरीहून बेंगळुरात आलेल्या ग्रामविकास आणि पंचायतराज खात्यातील कार्यकारी अभियंता नारायणगौडा बी. पाटील याने आनंदराव सर्कलमधील राजमहल हॉटेलमध्ये 2 कोटी रुपये आणले होते. त्याने ही रक्कम एका कंत्राटराकडून जमा केल्याचे समजते. प्राप्तिकर अधिकाऱयांना या रक्कमेविषयी सुगावा लागल्याची माहिती मिळताच नारायणगौडा फरार झाला. प्राप्तिकर अधिकाऱयांनी पोलिसांसमवेत राजमहल हॉटेलवर छापा टाकून 2 कोटी रुपये जप्त केले. तसेच नारायणगौडा यांच्या मालकीच्या केए 25 पी 2774 या इनोव्हा कारच्या चालकाला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.

नारायणगौडा याच्या हालचालींवर प्राप्तिकर अधिकाऱयांनी करडी नजर ठेवली होती. एका राजकारण्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने प्राप्तिकर अधिकाऱयांनी हावेरीतील नंदिनी लेआऊट येथील त्याच्या निवासावरही छापा टाकून 25 लाख रुपये जप्त केले आहेत.

लोकसभा निवडणूक वेळापत्रक घोषित झाल्यानंतर प्राप्तिकर अधिकाऱयांनी ग्रामविकास-पंचायतराज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, ऊर्जा खाते, महसूल खाते, पाणीपुरवठा खात्यासह अधिक उत्पन्न मिळणाऱया खात्यातील अधिकाऱयांवर नजर ठेवली आहे. प्राप्तिकर विभागातील गुप्तचर अधिकाऱयांनी काही खात्याच्या कंत्राटदारांवर आणि दलालांवरही नजर ठेवल्याचे समजते. त्यानुसार काही दिवसांपासून नारायणगौडा पाटील याच्याविषयी माहिती जमा केल्याचे समजते. त्याने ही रक्कम निवडणुकीसाठी जमा केल्याचे सांगण्यात आले आहे. जमा केलेली रक्कम गुरुवारी हावेरीहून बेंगळूरच्या राजमहल हॉटेलमध्ये आणण्यात आली होती. त्याकरिता हॉटेलमधील दोन खोल्या बुकींग केल्या होत्या. याविषयी स्पष्ट माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी छापा टाकून अधिकाऱयांनी 2 कोटी रुपये, लॅपटॉप, मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली

निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

बेंगळुरातील हॉटेलमध्ये प्राप्तिकर छाप्यात 2 कोटी रुपये जप्त केल्याप्रकरणासंबंधी भाजपचे विधानपरिषद सदस्य एन. रवीकुमार आणि तेजस्विनी गौडा यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची चौकशी करून पैशांचे स्रोत शोधून काढावा. तसेच फरार झालेल्या नारायणगौडा यांना अटक करावी, मागणी करण्यात आली. जप्त केलेली रक्कम मंत्री कृष्णभैरेगौडा यांना पोहोचविण्यात येत होते, अशी कबुली नारायणगौडा यांच्या कारचालकाने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला.