|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सेटींगच्या चाळणीतून सटकली वाळू

सेटींगच्या चाळणीतून सटकली वाळू 

प्रतिनिधी/ देवरुख

वाळू तस्कारांनी जिल्हय़ात धुमाकुळ घातला असून अनेक भागात रात्री खुलेआम वाळू तस्करी सुरु आहे. करजूवे खाडीत सक्शन पंप लावून सुरू असलेलया अवैध वाळू उपशाविरोधात एका पथकाने गुरूवारी रात्री कारवाई केली. मात्र ‘सेटींगच्या चाळणी’तून ही वाळू सटकल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे तालुका महसूल विभागाला याबाबत काहीच थांगपत्ता नाही. दरम्यान, गुहागरमध्येही अशी कारवाई झाली आहे.

तालुक्यात डिंगणी, माखजन, फुणगुस या खाडीपट्टय़ात छुप्या पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. यामध्ये प्रशासनाचे मोठे नुकसान होत असून लाखोंचा महसूल बुडत आहे. ही वाळू चोरुन काढली जात असल्याने सर्रासपणे रात्रीचा उपसा सुरु असतो. रातोरात उपसा करुन याची वाहतुक होते, मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून अभय मिळत असल्याचा आरोप होत आहे.

खाडीपट्टय़ाबरोबरच नदीपात्रातही अवैध वाळू उपसा सुरू असून त्याला सोन्याप्रमाणे भाव मिळू लागला आहे. तालुक्यातील बावनदी या अवैद्य उपसाच्या विळख्यात सापडली आहे. या नदीवर पर्शरामवाडी ते वाशी रावणंगवाडी या दरम्यान तर मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा झालेला दिसून येतो.  या ठिकाणी महसुल विभागाने वेळीच लक्ष घालून योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

करजुवे व धामापूर खाडीपट्टय़ात गेले महिनाभर दोन सक्शन पंपाव्दारे वाळूचा उपसा सुरु आहे. त्याचबरोबर अजूनही पाच सक्शन पंप खाडीलगत आणून ठेवण्यात आले असून बुधवारपासून वाळूचा उपसा सुरु झाला आहे. याची कुणकुण तालुक्याबाहेरील एका पथकाला लागली. त्यानुसार गुरुवारी रात्री तेथे धाड घातल्याची चर्चा आहे. या धाडीत सर्वांवर कारवाईची प्रक्रिया सुरु केली. मात्र ऐनवेळी सेटिंगची चाळण लागल्याने  कारवाई थांबल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे या कारवाईबाबत येथील महसुल विभागाला काहीच माहिती नाही. याबाबत तहसिलदार संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता, या कारवाईबाबत आपल्याला काहीच माहिती नसून संबंधित मंडळ अधिकाऱयाचा फोन लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. या सेटींगच्या कारवाईची मात्र शुक्रवारी दिवसभर सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.