|Sunday, August 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » इंद्राकडून वृत्रासुराची स्तुती

इंद्राकडून वृत्रासुराची स्तुती 

वृत्रासुर इंद्राला पुढे म्हणाला-जो मनुष्य आत्मा हा केवळ त्याचा साक्षी आहे, हे जाणतो, त्याला त्या गुणांचे बंधन नसते. हे इंद्रा, तू माझा हात आणि शस्त्र तोडून मला दुर्बळ केले आहेस. तरीसुद्धा मी तुझे प्राण घेण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत आहेच. हे युद्ध हा एक जुगारच अहे. यामध्ये प्राणांची बाजी लागते. बाणांचे फासे टाकले जातात आणि युद्धभूमी हा पट आहे. यामध्ये कोणाचा विजय होईल आणि कोण हरेल हे कळत नाही.

महामुनी श्रीशुकदेव परिक्षिती राजाला म्हणतात-वृत्रासुराच्या या निष्कपट वचनाची इंद्राने प्रशंसा केली आणि वज्र उचलले. यानंतर निगर्वीपणाने हसत हसत तो त्याला म्हणाला-हे दानवराजा, तू खरोखर सिद्धपुरुष आहेस, म्हणून तुला अशी बुद्धी झाली. तुझे धैर्य, निश्चय आणि भगवद्भाव अत्यंत विलक्षण आहे. लोकांना मोहित करणाऱया भगवंतांच्या मायेला तू निश्चितच पार केले आहेस. म्हणूनच तर तू तुझा आसुरी स्वभाव सोडून साधुपुरुष झाला आहेस. तू रजोगुणी प्रकृतीचा असूनही विशुद्ध सत्त्वस्वरूप भगवान वासुदेवांमध्ये तुझी बुद्धी स्थिर आहे, ही खरेच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्याची परम कल्याणप्रद भगवान श्रीहरिंच्या ठिकाणी भक्ती असते, त्याला क्षुद्र भोगांची काय पर्वा! जो अमृताच्या समुद्रात विहार करीत असतो, त्याला खड्डय़ातील पाणी काय करायचे? श्रीशुकदेव म्हणतात-परीक्षिता, अशा प्रकारे योद्धय़ांमधील श्रे÷, महापराक्रमी इंद्र आणि वृत्रासुर धर्माचे तत्त्व जाणण्याच्या इच्छेने एकमेकांशी संवाद करीत युद्ध करू लागले. राजन, आता शत्रुसूदन वृत्रासुराने पोलादाने बनविलेला एक भयंकर परिघ डाव्या हातात घेऊन गरगर फिरवीत इंद्रावर फेकण्याचा विचार केला. परंतु इंद्राने वृत्रासुराचा तो परिघ व हत्तीच्या सोंडेप्रमाणे असलेला त्याचा लांब हात आपल्या शंभर पेरे असलेल्या वज्राने एकदमच तोडून टाकला. दोन्ही भुजा मुळापासून तुटल्याने वृत्रासुराच्या दोन्ही खांद्यांमधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी असे वाटत होते की, जणू काही इंद्राच्या वज्राने पंख तुटलेला एखादा पर्वतच आकाशातून पडला आहे. पायी चालणाऱया पर्वताप्रमाणे अत्यंत प्रचंड शरीर असणाऱया वृत्रासुराने, आपली हनुवटी जमिनीला आणि वरचा ओठ स्वर्गाला लावला आणि आकाशाप्रमाणे विशाल मुख, सापासारखी भयानक जीभ व मृत्यूसमान क्रूर दाढा यांनी तो जणू त्रैलोक्मयाला गिळीत, आपल्या पायाच्या टाचांनी पृथ्वीला रगडीत आणि अत्यंत वेगामुळे पर्वतांची उलथा-पालथ करीत इंद्राजवळ आला. त्याने ऐरावत हत्तीसह त्याला गिळून टाकले. जणू एखाद्या बलवान अजगराने हत्तीलाच गिळावे. तेव्हा प्रजापती, महषी यांच्यासह देवांनी जेव्हा वृत्रासुराने इंद्राला गिळलेले पाहिले, तेव्हा ते अत्यंत दु:खी झाले आणि विलाप करू लागले. इंद्राने नारायणकवच धारण केल्यामुळे आणि योगमायेचे बळही त्याच्याजवळ असल्यामुळे वृत्रासुराने गिळून टाकल्यानंतर त्याच्या पोटात जाऊनही तो मरण पावला नाही.

Ad. देवदत्त परुळेकर