|Thursday, June 27, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सूर्यास्त…!

सूर्यास्त…! 

गोव्याच्या राजकीय क्षितिजावर गेली तीन दशके आपल्या अफाट बुद्धिचातुर्यावर आणि निर्णयाची क्षमता तसेच करारी बाण्याच्या आणि बेधडक व बिनधास्तपणे धाडसी निर्णय घेणाऱया कर्तव्यदक्ष, त्याचप्रमाणे अहोरात्र गोव्यावर आणि गोमंतकीयांवर तसेच मातीशी इमान राखणाऱया मुख्यमंत्री मनोहर गोपाळकृष्ण प्रभु-पर्रीकर यांच्या निधनाने हा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला असेच म्हणावे लागेल. स्वतंत्र गोमंतकाच्या इतिहासातील भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर हा एकमेव नेता सर्वसामान्य जनतेच्या हृदयात घर करून बसला. गोव्याच्या राजकीय इतिहासात स्वतःची वेगळी प्रतिमा स्वतःच्या वेगळा ठसा उमटविणारा हा एकमेव नेता. जनसेवेपुढे आपल्या संसाराला देखील दुय्यम स्थान देणाऱया पर्रीकरांची एकंदरीत भूमिका ही राष्ट्रपुरुषाएवढीच थोर होती. 1989 पासून राजकारणात चंचुप्रवेश करून राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांनी पक्षावर कशी निष्ठा असली पाहिजे याचे देशात दर्शन घडविले. कधीही पक्षाशी व पक्षाच्या ध्येयधोरणाशी प्रतारणा केली नाही वा पक्षाच्या कोणत्याही नेतृत्वाबद्दल कधी अनुद्गारही काढले नाहीत. पर्रीकर नावाच्या झंझावती वादळाने 1999 पासून गोव्यात काँग्रेसला मुळासकट उपटून टाकण्याचा प्रयत्न केला. नीतीमत्ता, प्रामाणिकपणा, राष्ट्रीय विचार, देशाबद्दलचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करणारा, थोर राष्ट्रीय नेत्यांच्या चारित्र्याचे वाचन करणारा, असंख्य मराठी साहित्यिकांवर नितांत प्रेम करणारा हा बुद्धिमान नेता हरपला. आपण ज्या एका अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण केले तशी परिस्थिती इतरांवर येऊ नये यासाठी गोरगरीब, सर्वसामान्य, होतकरू, युवावर्ग, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील सर्वच वर्गाला स्पर्श करणारा हा नेता मुख्यमंत्री असताना या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार न करता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून योजना आणि सवलतींचा पाऊस पाडणारा हा नेता आता आपल्यात राहिलेला नाही या कल्पनेने देखील डोळय़ातील अश्रु रोखू शकणार नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती मर्यादित. केंद्रातील काँग्रेस सरकारने चारही बाजूने कोंडी केल्यानंतर अभिमन्यूप्रमाणे सर्व दिशांनी संघर्ष करणाऱया या बलाढय़ नेत्याने जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्ती वर्षभरात करावी यासारखा चमत्कार आणखी कोणता असू शकतो? संरक्षण मंत्री म्हणून नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवड केली. एवढी मोठी जबाबदारी प्राप्त करणारे ते गोव्यातील पहिलेच बलाढय़ नेते ठरले. गोवा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कल्पना चातुर्याने योजना आखणारा आर्य चाणक्यांच्या तत्त्वानुसार राजनीतीतले प्रत्येक पाऊल विचाराने टाकणाऱया या नेत्याने विकास योजना राबविताना नेहमीच कर्णाची भूमिका बजावली. केंद्रीय वित्त आयोगाच्या बुद्धिमान अधिकाऱयांनाही आपल्या अर्थनीतीद्वारे तोंडात बोटे घालावयास लावणाऱया पर्रीकरांनी देशातील आदर्श अर्थमंत्री ही अलिखित पदवीही संपादन केली. पायात साधे चप्पल, साधी पॅन्ट, हाफ शर्ट तोदेखील कधीच इनशर्ट न करता. एवढय़ा अत्यंत साध्या वेशातील असा हा देशातील एकमेव मुख्यमंत्री! राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरून गोव्यात सुटाबुटात व टाय अडकविलेल्या कोणत्याही मोठय़ा नेत्यांसमोर असो वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला असो. पर्रीकरांच्या नेहमीच्या साध्या वेशात कधीही बदल झाला नाही. एवढेच काय! साऱया गोमंतकीयांचा ऊर भरून येणारा तो 2014 मधील दिल्लीतील शपथग्रहण समारंभातील क्षण. या देशाचे संरक्षणमंत्री म्हणून शपथग्रहण करणाऱया पर्रीकरांच्या नेहमीच्या कपडय़ांमध्ये कोणताही बदल झाला नाही. 1989 मध्ये गोमंतकाच्या राजकारणात छोटेसे पाऊल टाकणाऱया या नेत्याचा राजकीय जन्मच मुळी गोमंतकाच्या सेवेसाठी झाला होता. अक्षरशः झपाटल्याप्रमाणे या नेत्याने 1990 ते 94 दरम्यान स्वतः दुचाकी व नंतर मारुती 800 या गाडीने सारा गोवा अक्षरशः पिंजून काढला. पर्रीकरांचा जन्म मातृभूमीच्या उद्धारासाठी जन्मभूमीच्या सेवेसाठी होता. आपल्या अनेक भाषणात या मातृप्रेमी मनोहरांनी आईचा उल्लेख केला नाही असे कधी झाले नाही. जेवढे मातेवर प्रेम, तेवढेच मातृभाषांवर प्रेम, तेवढेच या मातृभूमीवर! आधुनिक गोमंतकाच्या जडणघडणीत पर्रीकरांचा सिंहाचा वाटा आहे. मातृभूमीशी इमान राखणारा तेवढीच विकासाची बेरीज मांडणारा, सरस्वतीचा हा उपासक नेहमीच विद्यार्थी वर्गासाठी दीपस्तंभच बनला. प्रकाशाच्या वाटा दाही दिशांना पसरलेल्या पर्रीकरांच्या राज्यात  विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना मांडणाऱया आधुनिक गोमंतकाच्या या शिल्पकाराने संपूर्ण देशात प्रथमच लॅपटॉप योजना आखून विद्यार्थीवर्गाला ई शिक्षणाने सुशिक्षित करणारा हा देशातील पहिला नेता. गोव्याला ई शिक्षणाचा पहिला मान त्यांनीच मिळवून दिला. गोव्याच्या विकासाच्या ध्येयाने ज्याला वेड लावले त्याने साऱयांना आपल्या कर्तृत्ववान आणि अंगी असलेल्या गुणांनी अक्षरशः वेड लावले. त्यांच्या जाण्याने आज सचिवालय पोरके झाले. मंत्रालयातील आधारस्तंभच गेला. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आपल्या अफाट बुद्धिमत्तेचे तेल बनवून प्रकाशमान करणारा दिवा आज मालवला. स्वतः आयआयटीमध्ये शिक्षण घेऊनदेखील गलेलठ्ठ पगाराची नोकरी न स्वीकारता केवळ या मातृभूमीची सेवा करणारा व जन्मभूमीला स्वर्ग मानून येणाऱया संकटांचा धीराने सामना करणाऱया, 12 महिने कर्करोगाशी झुंजणाऱया आणि अखेरपर्यंत जनसेवा करणाऱया या नेत्याचे जाणे कल्पनेपलीकडचे आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही कधी ना कधी इहलोकाची यात्रा सोपवून जाणारीच आहे हे माहीत असूनदेखील मनोहर पर्रीकर यांचे जाणे केवळ मनाला चटका लावणारेच नव्हे तर हृदयाला पीळ पाडणारी ही घटना आहे. पर्रीकरांचे कार्य हे एका कर्मयोद्धय़ाचे चरित्रच ठरते. गोवा राज्याशी व देशाशी इमानेइतबारे वागणाऱया या नेत्याने साऱया गोमंतकीय लेकरांच्या डोळय़ात आज कारुण्य आसवे आणली. एका कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष सच्चा नेत्याचे जाणे हृदयावर आघात करणारे आहे. या मातृभक्ताला लाख लाख प्रणाम….!