|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पब्जी गेममुळे गोंडोलीतील युवक बेशुद्ध

पब्जी गेममुळे गोंडोलीतील युवक बेशुद्ध 

वार्ताहर/ कोकरूड

  लहान मुलांपासून तरुणांपर्यंत लोकप्रिय झालेल्या व तरुणाईला विळखा घातलेल्या ‘पब्जी’ या गेमचे मानसिक दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. या गेममुळे गोंडोली (ता. शाहूवाडी) येथील पंकज लक्ष्मण पाटील हा 24 वर्षीय युवक मोबाईलवर गेम खेळता-खेळता बेशुद्ध झाला. ही गोष्ट पंकजच्या घरच्या लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताबडतोब त्याला कोकरूड (ता. शिराळा) येथील माऊली हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याच्यावर ताबडतोब उपचार सुरु केले. त्यामुळे काही वेळाने हा युवक शुद्धीवर आला. परंतु त्याच्या डोक्यातील पाब्जीचे खूळ निघायला तब्बल 24 तासाचा अवधी लागला.

   पोकेमॅन गो, ब्लू व्हेल यासारख्या मोबाईल गेम्सनी काही दिवसांपूर्वी मुलांना वेड लावले होते. त्यात आता पब्जीची भर पडली आहे. या पब्जीमुळे पंकज या 24 वर्षीय युवकाचा जीव जाता-जाता वाचला. सिव्हील डिप्लोमा धारक असलेला पंकज हा पब्जी या गेमच्या इतका आहारी गेला की, सलग तीन दिवस सकाळपासून ते रात्री एक ते दोन वाजेपर्यंत तो एकसारखा आपल्या मोबाईलवर गेम खेळू लागला. या तीन दिवसात तो इतका या गेमच्या आहारी गेला की, त्याला खाण्या-पिण्याची ही शुद्ध राहिली नाही. मोबाईलवर गेम खेळता-खेळता त्याला विकनेसपणा येऊन बेशुद्ध पडला. घरच्या लोकांनी त्याला कोकरूड येथील माऊली हॉस्पिटमध्ये दाखल केले.

  डॉक्टरांनी त्याच्यावरती ताबडतोब उपचार सुरु केले असता तो पूर्णपणे त्या गेममध्ये गुरफटून गेलेचे निदर्शनास आले. त्याच्या शरीरातील साखर झपाटय़ाने कमी होऊन तो बेशुद्ध झाल्याचे तपासांती समजले. डॉक्टरांनी त्याच्यावरती औषध-उपचार सुरु ठेवले. मात्र, त्याच्या डोक्यातील पब्जीचे खूळ काही केल्या निघेना. डॉक्टरांनी काही विचारले तरी तो गेममधील खेळाप्रमाणे हातवारे करी. हा सगळा प्रकार पाहून पंकजच्या घरची मंडळी देखील काळजीत पडली. शेवटी तब्बल 24 तासानंतर पंकज हा या गेमच्या विचारातून बाहेर पडला. नॉर्मल अवस्थेत आला. व त्याला काही विचारलेले समजू लागले. नंतर पंकजला व त्याच्या घरच्यांना डॉक्टरांनी पब्जीच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा सल्ला देऊन घरी पाठवले.

चौकट :- पब्जी हा गेम ग्रुप करून खेळायचा आहे. मुळात या ऍक्शनपट खेळाचे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत असतात. या खेळांचा प्रभाव असाच वाढत राहिला तर पुढची पिढी भावनाहिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पब्जी खेळाबाबत बोलायचं झालं तर त्याचे परिणाम यापद्धतीने समोर येताहेत. त्यामुळे पालकांनी याबाबत जागरूक राहणे गरजेच आहे.

– डॉ. प्रशांत ठोंबरे