|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर सात लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर सात लाखांचे सोने जप्त 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर काल बुधवारी एका महिला हवाई प्रवाशाकडून सुमारे सात लाख रूपये किंमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. कस्टम विभागाच्या दाबोळीतील पथकाने ही कारवाई केली. चार सोन्याच्या बांगडय़ा बुरख्याच्या हातांमध्ये लपवून या प्रवाशाने हे सोने शारजाहून भारतात आणले होते. त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. हे सोने 232 ग्रॅम वजनाचे आहे.

बुधवारी सकाळी एअर अरेबियन जी 9-492 विमानाने शारजाहून गोव्यात उतरलेल्या या महिला प्रवाशाबाबत कस्टमच्या अधिकाऱयांना संशय आल्याने त्यांनी तिची झडती घेतली असता, तिच्याकडे 232 ग्रॅम सोने सापडले. त्या महिलेने पूर्ण बाहय़ाचा बुरखा घातला होता. हे सोने त्या महिलेने बुरख्याच्या बाहय़ांमध्ये लपवले होते. हे सोने चार बांगडय़ाच्या स्वरूपात होते. मात्र, कस्टम अधिकाऱयांना संशय आल्याने तिचा तस्कारीचा प्रयत्न फसला. तिच्याकडून तस्करीचे सोने जप्त करण्यात आलेले असून तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 6 लाख 86 हजार 882 रूपये एवढी आहे.

साहाय्यक कस्टम आयुक्त एन. जी. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम अधिकारी व कर्मचाऱयांनी ही कारवाई केली. कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

गेल्या बारा महिन्यात 2.70 कोटी रूपयांचे सोने जप्त

कस्टम विभागाच्या दाबोळीतील तज्ञ पथकाने एप्रिल 2018 पासून केलेल्या कारवाईत आतापर्यंत 2.70 कोटी रूपये किंमतीचे सोने तर 75.14 लाख रूपये किंमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात आलेले आहे.

Related posts: