|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » किशोर वरक लोकसभा निवडणूक लढविणार!

किशोर वरक लोकसभा निवडणूक लढविणार! 

धनगर समाजाकडून उमेदवारी जाहीर : 2 रोजी भरणार उमेदवारी अर्ज

प्रतिनिधी \ओरोस:

आत्तापर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱयांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला फाटा दिल्याने या समाजातून लोकसभेसाठी स्वतंत्र उमेदवार निवडणूक लढविणार आहे. किशोर वरक यांना उमेदवारी देण्याचे जाहीर करण्यात आले असून देवगड येथून याचा शुभारंभ करण्यात आला आहे. 2 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कोणत्याही स्वरुपात निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर बुटे यांनी दिली.

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वपक्षांनी एसटी आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे इतर वंचित बहुजनांवरही अन्याय झाला आहे. त्यामुळे या सर्वांनी एकत्रितपणे लोकसभेतील हक्काच्या प्रतिनिधीत्वासाठी कंबर कसली आहे.

रत्नागिरी जिल्हय़ातील दादा आखाडे, पंकज नरवणकर, सुरेश आखाडे, अशोक पवार, वसंत झोरे आदींसह अनेक समाज नेत्यांनी किशोर वरक यांच्या नावाला पाठिंबा दिला असून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. मागील 12 वर्षे पत्रकारिता सामाजिक व राजकीय क्षेत्रात ते कार्यरत असून धनगर समाजाबरोबरच इतर वंचित बहुजन समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक आंदोलने केली. दरम्यान प्रचाराचा शुभारंभ देवगड येथून करण्यात आला आहे. यावेळी बाळूमामा मंदिराचे विश्वस्त बबन बोडेकर, संतोष साळकर, प्रभाकर बुटे, संजय बोडेकर, संतोष बोडके, बाळू कोकरे आदी समाज बांधव उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात धनगर समाजाचे सुमारे दोन लाख मतदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे अन्य बहुजनांचा पाठिंबा असल्याने प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यासाठीची ही लढत असल्याचे स्पष्ट केले.